हळद साठवण
|
जमीन
उत्तम निचऱ्याची मध्यम काळी, नदी काठची- पोयटा माती अती उत्तम. चुनखडीयुक्त व चोपण जमीन टाळावी.
पूर्व मशागत
उभ्या आडव्या २ नांगरटी, कुळवणी करणे, जमीन भुसभुशीत करणे.
सुधारित वाण
फुले स्वरूपा, सेलम, कृष्णा, राजापुरी, टेकूरपेटा.
पेरणी व लागवडीचे
१५ मे ते जून चा पहिला आठवडा. ७५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून सरीच्या दोन्ही बाजूस.
अंतर
३७.५ x ३० सें.मी. अंतरावर वरंब्यामध्ये लागण करावी. ठिबक सिंचनासाठी २० ते २५ सें.मी. उंचीचे १२० सें.मी. रुंदीचे गादी वाफे तयार करून ३० x ३० सें.मी.वर लागवड करावी.
बियाणे
गड्डे बियाणे २५ ते ३० क्विंटल प्रति हेक्टरी.
आंतरपिके
हळद + घेवडा, हळद + मुळा, हळद + पालेभाज्या, हळद + मेथी, हळद + मिरची.
खते
लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी ५० ते ८० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून टाकावे. रासायनिक खतांची मात्रा प्रति हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश द्यावी. लागवडीपूर्वी १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश द्यावे. नत्राची मात्र दोन समान हफ्त्यामध्ये लागवडीनंतर ६ व १० ते १२ आठवड्याने भरणी करतेवेळी द्यावी.
भरखते
हेक्टरी २ टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर भरणीच्या वेळी करावा.
सेंद्रीय हळद
१) जैविक बीज प्रक्रिया :
हेक्टरी ५०० लिटर पाण्यात व्हॅम (VAM) १२.५ किलो + पी.एस.बी. ५ किलो + ॲझोस्पायरिलियम ५ किलो मिसळून द्रावणात १५ मिनिटे कंद बुडवावेत.
२) खतांची मात्रा :
शेणखत १५-२० टन/हे. + लिंबोळी पेंड ४ टन/हे. + गांडुळ खत २ टन/हे.
भरणी करणे
हळदीचे कंद उघडे राहू नयेत यासाठी लागवडीनंतर १० ते १२ आठवड्यांनी मातीने भरणी करावी. भरणी करताना शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा द्याव्यात.
तणनियंत्रण
हळद लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमिन ओलसर असताना अॅट्राझीन उगवणपूर्व तणनाशक ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे. हळद उगवणीनंतर कोणतेही तणनाशक फवारू नये. तणांच्या तिव्रतेनुसार २ ते ३ वेळा खुरपणी करावी.
पाणी व्यवस्थापन
लागवडीनंतर ५ ते ७ दिवसाच्या अंतराने, पावसाळ्यात पाऊस नसल्यास १० ते १२ दिवसाच्या अंतराने तर हिवाळ्यात १२ ते १५ दिवसाच्या अंतराने जमिनीच्या प्रतिनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
पिकाचा कालावधी
७ ते ९ महिने
काढणी
पिकाची काढणी जातीपरत्वे पिकाचा कालावधी पुर्ण झाल्यावर करावी. काढणीपूर्वी जमिनीच्या प्रतिनुसार १५ ते २० दिवस पाणी देणे बंद करावे. सरीवरंबा पध्दतीवर कुदळीने खोदन काढणी करावी तर गादीवाफे पध्दतीवर मशिनच्या सहाय्याने काढणी करावी.
उत्पादन
सुधारित तंत्रानुसार लागवड केल्यास ओल्या हळदीचे हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल तर वाळलेल्या हळदीचे ६० ते ७५ क्विंटल उत्पादन मिळते. गादी वाफ्यावर लागवड केल्यास हळद काढणी यंत्राव्दारे काढणी करता येते त्यामुळे मजुरीत बचत होते.
प्रक्रिया
हळदीच्या जास्त उताऱ्यासाठी आणि कुरकुमीन टिकविण्याकरीता २०० किलो क्षमतेच्या कुकर यंत्रामध्ये १५ मिनीटात हळद वाफेवर ( १.२ कि/सें.मी') शिजवावी.
पिक संरक्षण
कंदमाशी
अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून कंदावर उपजिविका करतात. अशा गड्ड्यामध्ये नंतर रोगकारक बुरशी तसेच सूत्रकृमिंची शिरकाव होतो. त्यामुळे खोड व गड्डे मऊ होतात व त्यांना पाणी सुटून ते कुजतात.
नियंत्रण
क्विनालफॉस २५ % प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने १ ते २ फवारण्या कराव्यात. वेळेवर भरणी करावी. हेक्टरी ६ नग माती अथवा प्लॅस्टिकची पसरट भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीची बी २०० ग्रॅम + १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून वास बाहेर निघू लागल्यावर कंदमाशी आकर्षित होऊन मरू लागतात. सदरची उपाय योजना अत्यंत प्रभावी, कमी खर्चीक व सहजरित्या करता येण्यासारखी असल्याने सेंद्रिय हळद उत्पादनामध्ये महत्वाची भुमिका निभावणारी ठरु शकते तसेच अळ्यांकडून कंदांचे नुकसान करण्या अगोदरच कंदमाश्या मरत असल्याने विशेष प्रभावी आहे.
पानांवरील ठिपके (करपा)
पानांवर लंब गोलाकार तपकिरी रंगाचे अंडाकृती ठिपके पडतात. रोगट भाग वाळून तांबूस तपकिरी रंगाचा दिसतो.
नियंत्रण
नियंत्रणलागवडीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे. कार्बेन्डॅझिम १० ग्रॅम १० लिटर पाण्यात फवारावे.
कंदकुज
सुरळीतील पानांचे शेंडे व कडा पिवळे पडून १ ते १.५ से.मी. खालीपर्यंत वाळत जातात आणि पुढे पान संपुर्णपणे वाळले जाते. खोडाचा जमिनीलगतचा बुंधा व गड्डा काळपट, राखाडी पडतो. गड्डयावर दाब दिला असता त्यातून कुजलेले, घाण वास येणारे पाणी बाहेर येते.
नियंत्रण
लागवडीसाठी रोगमुक्त बियाणे वापरावे, उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. शेतात पाणी साचू देऊ नये. वेळेवर भरणी करावी. कंदवर्गिय पिकांवर पुन्हा कंदवर्गीय पिक घेऊ नये. कार्बेन्डझिम ५० डब्ल्यु.पी. १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे. पीक लागवडीच्या वेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलोग्रॅम प्रति हेक्टरी शेणखतातून मिसळून द्यावे.