ज्वारीचे पीक अगदी रेताड व चोपण जमिनी सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या अगर दुमट जमिनीत चांगले येते. काही मर्यादेपर्यंत क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनीत व pH मूल्य ५·५ असेपर्यंत अम्लीय जमिनीतही हे पीक वाढू शकते.
ज्वारी कोरडया मातीत वाढू शकते आणि दुष्काळासारख्या कठीण परिस्थितीतही तग धरू शकते. या पिकाला ताण सहन करण्याची क्षमता पुढील बाबींमुळे आली आहे : (१) मुळांचा विस्तार आणि पानांचा पृष्ठभाग यांचे गुणोत्तर जास्त आहे. (२) पाण्याच्या टंचाईच्या काळात ज्वारीची पाने गुंडाळून घेऊन बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण घटवतात. (३) दुष्काळात हे पीक दीर्घकाळ विश्रांती घेते, मरत नाही. (४) पानांवरील मेणाच्या आवरणामुळे वनस्पती सुरक्षित राहते.