भारतातील तंबाखूखालील एकूण क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र एकट्या आंध्र प्रदेशात असून एकूण उत्पादनाच्या ४३% उत्पादन त्या राज्यात होते. या खालोखाल गुजरात (२०% क्षेत्र) आणि कर्नाटक (८% क्षेत्र) या राज्यांचा क्रमांक लागतो. बिहार, ओरिसा, तमिळनाडू, उ. प्रदेश, प. बंगाल आणि महाराष्ट्रात ते प्रत्येकी सु. ३% आहे. आंध्र प्रदेशातील क्षेत्र बहुतांशी सिगारेट तंबाखूखाली असून ते मुख्यतः गुंतूरच्या आसपासच्या प्रदेशात आहे. भारतातील सिगारेट तंबाखूचे ९०% उत्पादन या राज्यात होते. गुजरात आणि कर्नाटक या दोन राज्यांत विडीच्या तंबाखूचे एकूण उत्पादनाच्या ९०% उत्पादन होते (गुजरात ५०%, कर्नाटक ४०%). हुक्क्याचा तंबाखू बहुतांशी उत्तरेकडील राज्यांत पिकतो सिगार व चिरुटाच्या तंबाखूचे उत्पादन तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात होते. महाराष्ट्रात कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांत राज्यातील ८०% तंबाखूचे क्षेत्र आहे. अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांत मिळून १०% क्षेत्र आहे. या सर्व जिल्ह्यांत विडीच्या तंबाखूचेच उत्पादन होते. आंध्र प्रदेशातील गुंतूर जिल्ह्याला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात ३०० ते ४०० हे. क्षेत्रात सिगारेट तंबाखूची लागवड होते.
भारतातील लागवडीखालील प्रकार
भारतात तंबाखूची लागवड सिगारेट, सिगार आणि चिरूट, सिगारसाठी वेष्टन, विडी, हुक्का, तपकीर, खाण्यासाठी आणि इतर खास उपयोगांसाठी केली जाते. जगातील इतर कोणत्याही देशांत भारताइतके तंबाखूचे लागवडीखालील प्रकार, लागवडीच्या निरनिराळ्या पद्धती आणि पानांवरील प्रकियांचे (क्युअरिंगचे) प्रकार नाहीत. भारतातील तंबाखूखालील एकूण क्षेत्रापैकी सु. ९०% क्षेत्रात नि. टाबॅकम या जातीची लागवड केली जाते व राहिलेल्या १०% क्षेत्रात नि. रस्टिका जातीची लागवड केली जाते. नि. टाबॅकम जातीमध्ये वर उल्लेख केलेल्या सर्व निरनिराळ्या उपयोगांसाठी खास प्रकार लागवडीत आहेत. ते ‘देशी’ या सर्वसाधारण नावाने ओळखले जातात. नि. रस्टिका जातीची सु. ९०% लागवड भारताच्या उत्तर आणि ईशान्य भागांत केली जाते. कारण या जातीला थंड हवामान मानवते. या जातीच्या तंबाखूमध्ये निकोटिनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती हुक्का, तपकीर, खाणे (जर्दा) व काही वेळा विडीसाठी उपयोगात आणली जाते. इतर उपयोगांसाठी ती उपयुक्त नाही. यांतील प्रकारांना ‘विलायती’ अगर ‘कलकत्तिया’ असे संबोधण्यात येते. वरील दोन्ही जातींचे भारतातील व्यापारी आणि लागवडीखालील प्रमुख प्रकार कोष्टक क्र. ३ मध्ये दिले आहे.
खाण्याच्या तंबाखूचे आणि तपकिरीसाठी वापरावयाच्या तंबाखूचे खास प्रकार (काही उपवाद वगळता) लागवडीत नाहीत. तंबाखूचा एकच प्रकार निरनिराळ्या प्रकारे वापरण्यात येतो. सर्वसाधारणपणे मध्यम ते जाड पानांचे आणि तिखट स्वादाचे प्रकार खाण्यासाठी व तपकिरीसाठी वापरतात. स्वस्त प्रकारची तपकीर तंबाखूच्या कोणत्याही प्रकारच्या भुकटीपासून बनवितात.
हवामान व जमीन
तंबाखू हे मूळचे उष्ण कटिबंधातील पीक असले तरी ते उष्ण, उपोष्ण व समशीतोष्ण अशा तिन्ही कटिबंधातील हवामानात वाढू शकते. वर्षातून ३ ते ४ महिन्यांपर्यंत सरासरी तापमान २१° ते ३१° से. असल्यास आणि कडाक्याची थंडी नसल्यास हे पीक चांगले येते. उत्तरेस स्वीडन व दक्षिणेस न्यूझीलंडपर्यंतच्या वेगवेगळ्या देशांत वेगवेग.