ऊस बीज प्रक्रिया

प्रस्तावना
सन २०१२-१३ मध्ये भारतातील ऊस पिकाखालील एकुण क्षेत्राच्या (५०.६३ लाख हे.) १५.८० टक्के क्षेत्र (८.०० लाख हे.) महाराष्ट्र राज्यात झाले होते. देशातील एकुण ऊस उत्पादनाच्या (३६१० लाख टन) १९.३९ टक्के उत्पादन (७०० लाख टन) महाराष्ट्र राज्यात होते. राज्याची दर हेक्टरी उत्पादकता (८७.५ टन/हे.) ही राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा (६६.१० टन/हे) जास्त होती. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.४०% होता.  हा राष्ट्रीय सरासरी उता-यापेक्षा (१०.२५ टक्के) जास्त होता.

लागवडीचा हंगाम
सुरु:
१५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी.
पुर्वहंगामी:
१५ ऑक्टोंबर ते १५ नोंव्हेबर.
आडसाली:
१५ जुलै ते १५ ऑगस्ट.
असे ऊस लागवडीचे हंगाम ऊस उत्पादकता व साखर उता-याच्या दृष्टीने योग्य आहेत.

जातींची निवड
महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा साखर संस्था (व्ही.एस.आय) मांजरी, पुणे यांच्या माध्यमातून आतापर्यंत अधिक ऊस उत्पादन आणि चांगला साखर उतारा असणा-या अनेक जाती प्रसारित केल्या आहेत. तथापी सध्या को. ८६०३२ (निरा), को ९४०१२ (फुले सावित्री), को.एम.०२६५ (फुले २६५), को. ९२००५ आणि को.सी ६७१ या मोठ्या प्रमाणात लागवडीखाली असणा-या जातींची प्रामुख्याने निवड करावी. महाराष्ट्रासाठी शिफारस केलेल्या ऊस जातींची माहिती तक्ता क्र १ मध्ये दिली आहे.

जमिन आणि लागवड
ऊसासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. उभी आडवी नांगरट, कुळवणी इ.मशागत करुन जमीन चांगली भुसभुसीत करावी.
लागवड
उसाची लागवड करताना मध्यम जमिनीसाठी दोन स-यातील अंतर १०० ते १२० सें.मी व भारी जमिनीसाठी १२० ते १५० सें.मी. ठेवून सरीचा लांबी उतारानुसार २० ते ४० मीटर ठेवावी. पट्टा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी ७५-१५० सें.मी. व भारी जमिनीसाठी ९०-१८० सें.मी पध्दतीचा अवलंब करावा. ऊसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. एक डोळा पध्दतीने लागण करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३०. सें.मी ठेवावे. शक्यतो कोरड्या पध्दतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून मातीने झाकून पाणी द्यावे किंवा ऊस लागणीपूर्वी सरीत हलकेसे पाणी सोडावे व वाफशावर कोली घेऊन लागण करावी. दोन डोळ्यांची टिपरी वापरायची असल्यास दोन   टिप-यांमधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावी. यासाठी ओल्या पध्दतीने लागण केली तरी चालेल. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. लागणीसाठी भारी जमिनीसाठी एकरी १०,००० व मध्यम जमिनीसाठी १२,००० टिपरी लागतात.

एक डोळा रोपांपासून ऊस लागवड
संशोधन केंद्रे आणि काही खाजगी नर्सरीमधून आता ऊसाची रोपे विक्रीस उपलब्ध आहेत. प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण ३० ते ४० दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात. यासाठी ९ ते १० महिने वयाचे चांगल्या बेणेमळ्यातील शुध्द, निरोगी बेणे रोपे तयार करण्यासाठी वापरावे. ऊस बेणे लागणीपूर्वी १०० लिटर पाणी + ३०० मि.ली.मेलॅथिऑन + १०० ग्रॅम बाविस्टीनची १० मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर जिवाणूंची बीज प्रक्रिया करावी. यामुळे बुरशीजन्यरोग व खवले किडीचा बंदोबस्त होतो. अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू खतांचे प्रमाण अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात उसाच्या टिप-या ३० मिनीटे बुडवून लागण करावी. त्यामुळे नत्राची ५० टक्के बचत होते. एक महिन्याच्या रोपांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी उसाची रोपे ३०-४० दिवस कोकोपीटमध्ये वाढविलेली असतात. त्यामुळे आपणास शुध्द निरोगी ऊस रोपे निवडून घेता येतात. निकृष्ट रोपे लागवडीस न वापरल्याने शेतात सर्वत्र एकसारखे उसाचे पीक वाढते, एकरी ऊसांची संख्या ४० ते ५० हजार मिळते. ऊस लोळण्याचे प्रमाण कमी राहून उसाचे सरासरी वजन २ ते ३ किलोपर्यत मिळते. रोप लागण पध्दतीत नेहमीच्या लागणीस ३०-४० दिवसांपर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी, तणनियंत्रण, खते, देखरेख यामध्ये बचत होते. पावसाने ओढ दिल्यामुळे वेळेवर लागण करता येत नाही. अशा वेळी पाऊस १ ते १.५ महिना लांबला तरी उसाची रोपे लागण करुन हंगाम साधता येतो. काही वेळेस अगोदरचे पीक काढणीस उशीर होतो किंवा जास्त पावसाने वापसा नसल्याने वेळेवर लागण करता येत नाही. अशा वेळेस ऊस रोपे लागण करुन वेळेवर हंगाम साधता येतो. ऊसाच्या दोन ओळीतील अंतर व रोपातील अंतर यावरुन एकरी लागणा-या ऊस रोपांची संख्या काढता येते.

आंतरपिके
आडसाली उसामध्ये भुईमूग, चवळी, सोयाबीन, भाजीपाला, तर पूर्वहंगामी उसामध्ये बटाटा, कांदा, लसूण, पानकोबी, फुलकोबी, पालेभाज्या, हरभरा, वाटाणा आणि सुरु ऊसामध्ये उन्हाळी भुईमूग, पानकोबी, फुलकोबी, नवलकोल, मेथी, कोथिंबीर, गवार, भेंडी इ.पिके आंतरपिक म्हणून घेता येतात.

उस बेणे आणि प्रक्रिया
बेणे मळ्यात वाढविलेले १० ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्टया शुध्द बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. उस बेणे लागवणीपूर्वी १०० लिटर पाणी + ३०० मि.ली. मेलॅथिऑन + १०० ग्रॅम बाविस्टीनची १० मिनीटांसाठी बेणे प्रक्रिया केल्यानंतर जिवाणूंची बीज प्रक्रिया करावी. यामुळे बुरशीजन्य रोग आणि खवले किडीचा बंदोबस्त होतो.अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू खतांचे प्रमाण अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणात उसाच्या टिप-या ३० मिनीटे बुडवून लागण करावी. यामुळे नत्राखतामध्ये ५० % ची तर स्फुरद खतामध्ये २५ % बचत करता येते.

एकात्मिक खत व्यवस्थापन
रासायनिक खतांचा असंतुलित वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता कमी झाली आहे. यासाठी सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक अशी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे.

सेंद्रिय खते
सुरु, पूर्वहंगामी व आडसाली ऊसासाठी प्रति हेक्टरी अनुक्रमे २० (४० गाड्या), २५ (५० गाड्या) व ३० (६० गाड्या) टन शेणखत अथवा पाचटाचे कंपोष्ट खत प्रती हेक्टरी ७.५ टन (१५ गाड्या), प्रेसमड केक प्रती हेक्टरी ६ टन (१२ गाड्या) आणि गांडूळ खत प्रती हेक्टरी ५ टन ( १० गाड्या) ऊस लागवडीपूर्वी  दुस-या नांगरटीच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोष्ट खताची उपलब्धता नसल्यास ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा.

रासायनिक खते
ठिंबक सिंचनातून नत्रयुक्त खते
ठिंबक सिंचनातून देण्यासाठी युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळणारे उत्तम नत्रयुक्त खत आहे. लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसाच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते. पांरपारिक स्फुरदयुक्त खते नेहमीप्रमाणे दोन समान हप्त्यात ऊस लागणीचे वेळी व मोठ्या बांधणीचे वेळी जमिनीतून द्यावीत.
ठिंबक सिंचनातून विद्राव्य खते
सुरु ऊसासाठी विद्राव्य खताची शिफारस
मध्यम खोल, काळ्या जमिनीत सुरु ऊसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खताचा कार्यक्षम वापर आणि आर्थिक फायद्यासाठी ८० % विद्राव्य खते वरिल तक्यानुसार दर आठवड्यास एक या प्रमाणे २६ हप्त्यात ठिबक सिंचनातुन देण्याची शिफारस देण्यात येत आहे. तसेच ठिबक सिंचनाद्वारे १००% बाष्पपर्णात्सना एवढे पाणी एक दिवसाआड देण्यात यावे.


सूक्ष्म अन्नद्रव्ये
जमिनीचे माती परिक्षण करुन घेणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार त्या त्या सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मॅगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स प्रति हेक्टर चांगल्या कुजलेल्या शेणखतात (१०:१ प्रमाणात ) १ -२ दिवस मुरवून सरीत द्यावे. स्फुरदयुक्त खतांसाठी शक्यतो सिंगल सुपर फॉस्पेटचा वापर करावा. त्यामुळे गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची वेगळी मात्रा द्यावी लागणार नाही.

आंतरमशागत
पीक ४ महिन्याचे होईपर्यत २ - ३ खुरपण्या कराव्यात व दातेरी कोळप्याने २ - ३ कोळपण्या कराव्यात किंवा तणांचा बंदोबस्त करण्यासाठी ऊस लागवडीनंतर ३ - ४ दिवसांनी जमीन वापशावर असताना ५ किलो अॅट्रॅझीन (अॅट्रटॉप) किंवा मेट्रीब्युझीन (सेंकॉर) १.२५ किलो प्रति हेक्टरी १००० लिटर पाण्यात विरघळून संपूर्ण जमिनीवर फवारावे. तणांचे प्रमाण जास्त असल्यास ऊस लागणीनंतर दोन महिन्यांनी    २-४-डी (क्षार) १.२५ किलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात विरघळून तणांवर फवारावे किंवा ६० दिवसांनी कोळपणी करावी अथवा ऊस लागवणीनंतर हरळी, लव्हाळा यासारखी बहुवर्षीय तणे आढळस्यास ग्लायफोसेट २.५ किलो क्रियाशील घटक ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी काळजीपूर्वक फक्त तणांवरच फवारावे. यासाठी डब्ल्यु.एफ.एन – ४० ( V आकाराचा ) नोझल वापरावा व नोझलवर प्लॅस्टीक हुड बसवावे.पाचटाचा वापर केला नसेल तर खोडवा पिकातील तणनियंत्रण करण्यासाठी खोडवा उगवून आल्यानंतर (४ आठवड्यांनी) ग्लायफोसेट २.५ किलो क्रियाशील घटक ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी काळजीपूर्वक फक्त तणावरच फवारणी करावी.

मोठी बांधणी
ऊस लागवडीनंतर १६ ते २० आठवड्यांनी रासायनिक खतांची मात्रा देऊन पहारीच्या औजाराने वरंबे फोडून आंतर मशागत करावी व रिजरने मोठी बांधणी करावी. पाणी देण्यासाठी स-या वरंबे दुरुस्त करुन घ्यावेत.

पाणी व्यवस्थापन
आडसाली, पूर्वहंगामी, सुरु व खोड्या उसासाठी अनुक्रमे ३४० ते ३५०, ३०० ते ३२५, २५० ते २७५ व २२५ ते २५० हेक्टर सें.मी. पाण्याची गरज असते. मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या ८ सें.मी. खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर १० सें.मी खोलीच्या पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १४ ते १५ दिवसांनी व हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
ऊस वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाचे पाणी
उस उगवण अवस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात वरंबा बुडेपर्यत पाणी देऊ नये. यावेळी ऊसाला जास्त पाणी दिल्यास नत्रयुक्त खते वाया जातात. कमी पाण्यामुळे जमिनीतील पाणी व हवा यांचा समतोल राखला जातो. गुळाची वाढ व कार्यक्षमता योग्य राहते.
उसाची पाण्याची गरज व ठिबक संच चालवण्याचा कालावधी

खोडवा व्यवस्थापन
गाळपासाठी पक्व ऊस पिकाची जमिनीलगत तोडणी करावी, बुडखे मोकळे करुन पाचट सरीत लोटावे. वरती राहिलेले बुडखे धारदार कोयत्याने छाटावेत, छाटलेल्या बुडख्यावर ०.१ % टक्के बाविस्टीनची फवारणी करावी. सरीत लोटलेल्या पाचटावर ८ किलो युरिया, १० किलो सिंगल सुपर फॉस्पेट आणि १ किलो पाचट कुजविणारे जिवाणू प्रति टन पाचटासाठी वापरावे व खोडवा पिकास पाणी द्यावे. वापसा आल्यानंतर ५० टक्के रासायनिक खतांची शिफारशित मात्रा (सूक्ष्म अन्नद्रव्यांसह) पहारीच्या सहाय्याने बेटापासून अर्धा फूट अंतरावर, अर्धा फुट खोलीवर व दोन खड्ड्यामधील अंतर १ फूट ठेवून सरीच्या बाजूने ऊस तुटल्यावर १५ दिवसांचे आत द्यावी आणि उर्वरित ५० टक्के मात्रा याच पध्दतीने परंतु सरीच्या विरुध्द बाजूने १३५ दिवसांनी द्यावी.

पीक सरंक्षण
बाविस्टीनच्या ०.१ टक्के (१०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम) बेणे प्रक्रियेमुळे उसातील काणी रोगाचा बंदोबस्त होतो. आडसाली उसात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एकरी दोन फुले ट्रायकोकार्डची १० दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ प्रसारणे करावीत. हुमणीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस एकरी १ लिटर, ४०० लिटर पाण्यात मिसळून जमिन वापश्यावर असताना सरीतून द्यावे. तसेच पहिला पाऊस झाल्यानंतर निंब, बाभुळ व बोर या झाडावरील भुंगेरे प्रकाश कंदिल व रॉकेलचा वापर करुन सामुदायिकरित्या रात्रीचे वेळी गोळा करुन नष्ट करावेत. कांडी किडीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन फुले ट्रायकोकर्डस् मोठ्या बांधणीनंतर दर १५ दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी एक महिन्यापर्यंत लावावीत. पोंग्यातील पिढ्या ढेकूण या किडीच्या बंदोबस्तासाठी मिथिल डिमेटॉन २५ टक्के प्रवाही ३० मि.ली किंवा डायमिथोएट ३० टक्के प्रवाही २६ मि.ली. किंवा मेलॅथिऑन ५० टक्के प्रवाही २० मि.ली यापैकी कोणतेही एक किटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी मेलॅथिऑन ५० टक्के प्रवाही २० मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणे. लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी कोनोबाथ्रा, मायक्रोमस, डिफा अशा मित्र किटकांचे संवर्धन करावे, मित्र किटकांची उपलब्धता नसल्यास फोरेट १० टक्के दाणेदार एकरी ६ ते ८ किलो या प्रमाणात ९ महिन्यापर्यंतच्या उसास वापरावे. किंवा मिथिल-डिमेटॉन २५ टक्के प्रवाही किंवा डायमिथीएट ३० टक्के प्रवाही यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रत्येकी १० लिटर पाण्यात १५ मिली याप्रमाणात मिसळून आलटून-पालटून आवश्यकतेनुसार २-३ वेळा फवारावे.

ऊस तोडणी
उसाची तोडणी हंगामनिहाय व पक्वता पाहून करावी. तोडणीपूर्वी पिकाचे पाणी १५ दिवस बंद करावे. तोडलेला ऊस ताबडतोब गळीतास पाठवावा. सुरु १२-१३ महिने, पूर्वहंगामी १४-१५ महिने आणि आडसाली १६-१८ महिन्यात ऊस तोडणी करावी.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने सन २०११ ते २०१३ या वर्षात केलेल्या शिफारशी
• अवर्षण प्रवण विभागातील १.०० हेक्टर बागायत जमिन असणा-या शेतक-यांना शाश्वत उत्पादनासाठी मफुकृवि, राहूरी अंतर्गत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी विकसित केलेली एकात्मिक शेती पध्दतीतील पिक उत्पादन ०.६० हेक्टर नगदी पिके (सोयाबीन, पूर्वहंगामी ऊस + बटाटा), ०.२५ हेक्टर हंगामी पिके (सोयाबीन, मुग, कांदा, बाजरा, रब्बी ज्वारी, गहु, हरभरा आणि चवळी), ०.१४ हेक्टर चारा पिके (हंगामी चारा पिके ज्वारी, मका ०.०४ हेक्टर व बहुवार्षीक गवत ०.१० हेक्टर) आणि गाय पालनासाठी (०.०१ हेक्टर) या घटकांचा आंतर्भाव असलेल्या पध्दतीचा अवलंब करण्याची शिफारस करण्यात येत आहे. (२०११)
• ऊस लागवड करण्याच्या अगोदर दोन डोळ्यांच्या टिप-यांना (३०,००० टिपरी/हेक्टर) ०.१ टक्का बुरशीजनक कार्बनडेंझिम) + १०० पीपीएम जिब्रॅलिक आम्ल या संजीवकाच्या द्रावणात १५ मिनीटे बुजवुन प्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात येत. (२०११)
• ऊस बेणे मळ्यापासुन दोन डोळे टिपरी बेण्याच्या अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी प्रति हेक्टरी ५० टन शेणखत, ६०० किलो नत्र, २३० किलो स्फुरद आणि ११५ किलो पालाश खत मात्रेची शिफारस करण्यात येत. (२०११)
ऊस बेणे मळ्यासाठी विभागणी नुसार रासायनिक खते द्यावयाच्या तक्ता
• पश्चिम महाराष्ट्रातील मध्यम खोल काळ्या जमिनीत पूर्वहंगामी उसाच्या (वाण-को.८६०३२) आणि साखरेच्या अधिक उत्पादनासाठी आणि नत्र, स्फुरद व पालाश खतांचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी १०० % शिफारशीत खत मात्रा (हेक्टरी ७२५ किलो युरिया, ३७० किलो डी.ए.पी आणि २८५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांपासून तयार केलेल्या) बिक्रेट मार्फत पहारीच्या सहाय्याने  ५० % खताची मात्रा लागवडीच्या वेळी सरीच्या एका बाजूला आणि उर्वरित ५० % लागवडीनंतर १३५ दिवसांनी सरीच्या बाजूला ३० सें.मी अंतरावर १० सें.मी अंतरावर १० सें.मी खोल खड्डे घेऊन कांडीपासून १० सें.मी. अंतरावर देण्याची शिफारस केली आहे (२०११)
• पूर्वहंगामी उसाच्या (वाण-को ८६०३२) लागण आणि खोडवा पिकाच्या ऊस व साखरेच्या अधिक उत्पादनासाठी तसेच जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या २५ % सेंद्रिय खताद्वारे आणि ७५ % रासायनिक खताव्दारे देण्याची शिफारस करण्यात येत आहे. याकरिता ऊस लागवडीअगोदर ताग पेरून गाडावा, बेणे प्रक्रियेसाठी प्रति हेक्टरी १०० लिटर पाण्यात ५ किलो एकत्रित जिवाणू खते (अॅझोटोबॅक्टर, अॅसिटोबॅक्टर आणि पी.एस.बी. प्रत्येकी १.२५ किलो) मिसळावीत आणि ३००:१२८:१२८ किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी नवीन लागवडीसाठी द्यावा आणि खोडव्यासाठी जागेवर शिफारशीनुसार पाचट (७.५ टन/हे.) कुजवून, ५ किलो एकत्रित जिवाणू खतांचा जमिनीमध्ये वापर करण्याची आणी २२५:१०५:१०५ किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टर देण्याची शिफारस केली आहे. (२०११)
• सुरु ऊसामध्ये वेलवर्गीय तणांच्या व्यवस्थापनासाठी मेट्रीब्यूझीन प्रति हेक्टरी १.२५ किलो (क्रियाशील घटक) उगवणीपूर्वी आणि २-४ डी या तणनाशकाची प्रति हेक्टरी १ किलो या प्रमाणात ऊस लागवडीनंतर ७५ दिवसांनी फवारणी करण्याची शिफारस केली आहे. (२०१२)
• पश्चिम महाराष्ट्रातील मध्यम खोल कोळ्या जमिनीत खोडवा ऊसाचे आणि साखरेचे अधिक उत्पादनासाठी आणि खतांचा अधिक कार्यक्षम वापर करण्यासाठी प्रति हेक्टरी १८७:८७:८७ किलो नत्र स्फुरद व पालाश ही खतमात्रा युरीया, डी.ए.पी आणि म्युरेट ऑफ पोटॅश या खतांपासून तयार केलेल्या ब्रिकेटमार्फत खालील मुद्दयांचे आधारे देण्याची शिफारस करण्यात येत आहे.
• ५० % खतमात्रा ब्रिकेटच्या स्वरुपात बुडख्यापासून १० सें.मी खोल खड्डे घेऊन, दोन खड्ड्यांमध्ये ३० सें.मी अंतर ठेवून द्यावे. (२०१२)
• ऊस पिकावर येणा-या पोक्का बोंग रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी, रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर ०.३० % मॅन्कोझेब या बुरशीनाशकाच्या तीन फवारण्या बारा दिवसांच्या अंतराने घेण्याची शिफारस केली आहे. (२०१२)
• व्हिएसआय ४३४ या लवकर पक्व (१० महिने) होणा-या ऊस वाणाचे उत्पादन (१२८, ३९ टन/हे.) आणि साखर उत्पादन (२०.९३ टन/हे.) तुल्य वाण कोसी ६७१ पेक्षा अनुक्रमे १७.८६ %         (१०८.९४ टन/हे.) व २३.७७ % (१६.९१ टन/हे) अधिक असुन हा वाण खोडवा पिकासाठी योग्य आहे. या वाणात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे. हा वाण कांडी काडीस कमी प्रमाणात बळी पडणारा असून काणी, गवताळ वाढ, पोक्का बोंग आणि लाल कुज (प्लग पध्दत) या रोगास मध्यम प्रतिकारक्षम आहे. हा वाण साखर कारखान्याच्या सुरुवातीच्या काळात गाळपासाठी योग्य आहे. महाराष्ट्रात पूर्व हंगाम व सुरु हंगामात लागवड करण्यासाठी या वाणाची शिफारस करण्यात येत आहे. (२०१२)
• पश्चिम महाराष्ट्रात पुर्वहंगामी ऊस लागवड अधिक किफायतशीर होण्यासाठी ऊस लागवडीनंतर हरभ-यांची आंतरपिक म्हणून वरंब्याच्या माथ्यावर टोकण पध्दतीने लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. (२०१३)
• पूर्व हंगामी व खोडवा ऊस पिकाच्या अधिक किफायतशीर होण्यासाठी ऊस लागवडीनंतर हरभ-यांची आंतरपिक म्हणून वरंब्याच्या माथ्यावर टोकण पध्दतीने लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे (२०१२)
• विद्यापीठाने विकसित केलेल्या “खोडवा व्यवस्थापन” या सुधारित तंत्रज्ञानाची अनभिन्नता बहुतांश ऊस उत्पादकांकडे आढळल्याने त्याचा प्रत्यक्ष अवलंब देखील अतिशय कमी प्रमाणात दिसुन आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पाणी टंचाईच्या परिस्थितीत खोडवा ऊस उत्पादनात भरीव वाढ होण्याकरिता, विद्यापीठाने विकसित केलेल्या जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी सुधारित पाचट व्यवस्थापन, जमिनीलगत छाटलेल्या बुडख्यांचे व्यवस्थापन, पहारीने खतांचे व्यवस्थापन आणि एक डोळा पध्दतीने रोपांद्वारे पिकातील नांगे भरणे वा खोडवा ऊसातील किमान मशागतीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी, राज्य शासनाने विद्यापीठामार्फत जिल्हावार प्रात्यक्षिके व प्रशिक्षण देण्याची शिफारस करण्यात येत आहे. (२०१३)
ऊस पिकाचे आपत्कालीन व्यवस्थापन
ऊस हे उष्ण कटीबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान, २० ते ३० सें. तापमान,      ८०-९०% आर्द्रता, प्रखर सुर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते; तथापी कडक उन्हाळा, तसेच पाऊस काळातील कमी/नगण्य पाऊसमान यामुळे ऊस पिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. पिकाच्या काही महत्त्वाच्या शरीरक्रियाशास्त्रीय व जिवरासायनिक क्रियांवर परिणाम होवून बाष्पीभवनाचा वेग वाढतो व पेशी अंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो. प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते. त्यामुळे या काळात योग्य व्यवस्थापन केले नाही तर उत्पादनात १५ ते ५० इतकी लक्षणीय घट येते.
आपत्कालीन परिस्थितीत उसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
1. ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतक-यांनी ठिबक अथवा तुषार सिंचन किंवा रेनगन पाणी व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
2. को ८६०३२, कोएम ०२६५ व को ७४० हे वाण इतर जातींपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यामुळे नवीन लागवडीसाठी अशा जातींचा प्राधान्याने वापर करावा.
3. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतून पाणी द्यावे.
4. पाण्याचा ताण पडत असल्यास ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावी. जेणेकरुन पाण्याचे वाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
5. पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास लागणीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी २ % म्युरेट ऑफ पोटॅश व २ % युरीया यांचे मिश्रण करुन पिकावर फवारणी करावी.
6. पाण्याची कमतरता असल्यास बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ % केवोलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
7. पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी नेहमीच्या पाटाने पाणी देण्याच्या पध्दती ऐवजी सुरुवातीस खर्चिक असली तरी ठिबक जलसिंचन पध्दतीचा वापर करावा.
8. ऊस पिक हे तण विरहीत ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होवून ऊस वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
9. शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
10. लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी ५ ते ६ टन पाचटाचे आच्छादन करुन प्रति टन पाचटासाठी ८ किलो युरीया, १० किलो सिंगल सुपर फॉस्पेट व १ किलो पाचट    कुजविणा-या जिवांणूचा वापर करावा.