हरभरा अर्थचक्र

रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे. सन २०१७-१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र १८.४८ लाख हेक्टर, उत्पादन १८.९१ लाख टन तर उत्पादकता १०२३ किलो/ हेक्टर अशी आहे. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा १४.८४ टक्के आहे.


जमीन
हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण किंवा क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये.तसेच जमिनीचा सामु ६.५ ते ७.५ या दरम्यान असावा.


पूर्वमशागत
खरीपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन पाळया दयाव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरीपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. या प्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.


पेरणीची वेळ
हरभरा हे रब्बी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची सोय अजिबात नसेल तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे २५ सप्टेंबरनंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण वापरावेत. बागायती हरभरा २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर यादरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. पेरणीची वेळ लांबल्यास किंवा डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पन्न फार कमी मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.


सुधारित वाण
देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत आणि काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पी.के.व्ही - २ (काक -२) पीकेव्ही -४ आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात. विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नविन वाण यांत्रीक पद्धतीने काढणी करण्यासाठी प्रसारीत केला आहे.


पेरणीची पद्धत आणि बियाण्याचे प्रमाण
सामान्यत: देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करावी. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपातील १० सें.मी. अंतरावर टोकण होईल असे ट्रॅक्टरवर चालणारे पेरणीयंत्र महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केले आहे. त्याचा वापर करणे अधिक चांगले. या प्रकारे पेरणी केल्यास विजय हरभऱ्याचे हेक्टरी ६५ ते ७० किलो तर विशाल, दिग्विजय, विराट किंवा पी.के.व्ही - २ या वाणांचे हेक्टरी १०० किलो बियाणे लागते. पीकेव्ही-४ आणि कृपा वाणाकरिता १२५-१३० किलो/हेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो. भारी जमिनीत ९० सें.मी. रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर एक-एक बियाणे टोकावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करुन वापशावर पेरणी केली असता उगवण चांगली होते.


बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी, यानंतर २५० ग्रॅम रायझोबियम प्रति १० किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे. असे बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी. यामुळे पिकाचे रोप अवस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होते. मुळावरील नत्राच्या ग्रंथी वाढतात आणि पिकाची वाढ चांगली होते.


हरभऱ्याचे सुधारित वाण
खतमात्रा
हरभऱ्याला हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश खताची आवश्यकता असते. यासाठी हेक्टरी १२५ किलो डीएपी आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाणालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरुन द्यावे. खत विस्कटून टाकू नये. पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास २ टक्के युरीयाची फवारणी करावी.


आंतरमशागत
पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवावे. पीक २० दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते. कोळपणीनंतर एक खुरपणी करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते. तणनियंत्रणासाठी तणनाशक वापरावयाचे असल्यास पेरणी करताना वापशावर स्टाँप (पेंडीमेथीलीन) हे तणनाशक २.५ लिटर प्रति हेक्टर प्रमाणे ५०० लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.


पाणी व्यवस्थापन
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यमजमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीसपाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. त्यासाठी पहिले पाणी ३०-३५ दिवसांनी व दुसरे पाणी ६५-७० दिवसांनी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सेंमी पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ सें.मी.) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा मुळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.


तुषार सिंचन
हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. सारा, पाट-वरंबा यासारख्या पद्धतीने पाणी दिल्यास जमीन दाबून बसते व जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो व त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. परंतु तुषार सिंचनाने जमीन नेहमी भुसभुशीत राहते. कोणतीही मशागत अतिशय सुलभ करता येते. अगोदर तुषार सिंचनाने जमीन ओलावून मशागत केली आणि तिफन किंवा पाभरीच्या सहाय्याने काकऱ्या पाडून हरभरा बियाणे टोकण केले तर पिकाची उगवण अतिशय चांगली होते. तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास शेतामध्ये सारा, पाटावरंबा पाडण्याची गरज नसते. पर्यायाने यावरील खर्चात बचत होते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजसारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मुळकुज रोगामुळे होणारे नुकसात टाळता येते. नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीत जास्त पाण्यामुळे पिकास दिलेली खते, अन्नद्रव्ये वाहून किंवा खोलवर जाण्याची शक्यता असते. शिवाय वाफसा लवकर येत नसल्याने अन्नद्रव्ये, खते पिकास उपलब्ध होतीलच याची खात्री नसते. मात्र तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्यामुळे पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वाफसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता वाढते. अशी रीतीने तुषार सिंचन पद्धतीने हरभरा पिकास पाणी दिल्यास हरभरा उत्पादनात आशादायक आणि भरीव वाढ होते.


पीक संरक्षण
हरभरा पिकाचे घाटेअळीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. पीक ३ आठवडयाचे झाले असता त्यावर बारीक अळया दिसू लागतात. पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात. याकरिता पिकास फुलकळी लागण्याच्या वेळेस पहिली फवारणी करावी. यासाठी २५ किलो निंबोळी पावडर रात्रभर ५० लिटर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी कापडाच्या सहाय्याने अर्क काढून त्यामध्ये ४५० लिटर पाणी टाकावे. हे द्रावण १ हेक्टर क्षेत्रावर फवारावे. पुढे १० ते १५ दिवसांनी हेलिओकिल ५०० मिली ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टर या विषाणूजन्य किटकनाशकाची फवारणी करावी. आवश्यकता असेल तर तिसरी फवारणी १८.५ % एस.सी. क्लोअॅन्ट्रीनिलीप्रोल १०० मिली हेक्टरला ५०० लिटर पाण्यातून फवारावे, या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. त्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २०० ग्रॅम ज्वारी, शेतामध्ये पेरावी. या पिकांचा मित्रकिडींच्या आकर्षणासाठी उपयोग होतो. त्यामुळे घाटेअळीचे नियंत्रण होते. पक्षांना बसायला जागोजागी तूर काटक्याची मचाणी लावावीत. त्यावर कोळसा, चिमण्या, साळुख्या असे पक्षी येतात आणि अळ्या वेचतात तसेच हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. त्यामुळे किडीचे नेमके प्रमाण कळते आणि फवारण्या देणे योग्य ठरते.


काढणी
हरभरा पीक ११० ते १२० दिवसांमध्ये तयार होते. पीक ओलसर असताना काढणी करु नये. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. यानंतर धान्यास ६-७ दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला (५ टक्के) घालावा. त्यामुळे साठवणीत कीड लागत नाही.


उत्पादन
अशाप्रकारे सुधारित वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हरभऱ्याची लागवड केल्यास सरासरी २५ ते ३० क्विटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.