मसूर लागवड करण्यापूर्वी

प्रस्तावना
महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे १२००० हेक्टर क्षेत्र आहे. व हेक्टरी सरासरी २५० किलो उत्पादन येते. हे पीक रबी हंगामात मुख्यतः मराठवाडयातील परभणी, औरंगाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यात कोरडवाहू पद्धतीने घेण्यात येते. मसूर डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण मूग, उडीद, तूर किंवा हरभरा डाळीपेक्षा अधिक (२६ टक्के) असल्यामुळे या डाळीस अधिक मागणीही असते.

हंगाम व जमीन
या पिकास थंड हवामान मानवत असल्यामुळे रबी हंगामात हे पीक घेतले जाते. मध्यम काळी, पोयटयाची किंवा नदिकाठची निचयाची जमीन याला पोषक ठरते. पावसाळयातील पाणी जमिनीत ओलाव्याच्या रुपाने जेवढे शिल्लक असेल तेवढे उत्पादन अधिक मिळते.

पेरणी
पेरणी शक्यतो ऑक्टोबरमध्ये संपवावी. पेरणीस जसजसा उशीर होईल तसतसे उत्पादन कमी मिळते. पेरणी ३० सें.मी. च्या पाभरीने करावी. हेक्टरी १० किलो बियाणे लागते.

खत पुरवठा
कोरडवाहू पिकाला खत दिले जात नाही.परंतु हेक्टरी २० ते २५ किलो नत्र आणि ५० ते ६० किलो स्फुरद दिल्यास फायदा होतो. बागायती पिकास वरीलप्रमाणे खत पुरवठा.

आवश्यक समजावा
कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथील बागायती मसूर पिकाच्या खत मात्रा प्रयोगावरुन स्पष्ट होते की या पिकाला खत पुरवठा करणे फायदेशीर ठरते. प्रयोगावरुन असे दिसून येते की, हे पीक बागायती पद्धतीने घ्यावयाचे झाल्यास हेक्टरी २५ किलो नत्र ७५ किलो स्फुरदाचा पुरवठा केल्यास उत्पादन दुप्पट मिळू शकते.

सुधारित जाती
१) पुसा-१-१ व पुसा १-५ या जाती कमी पावसाच्या प्रदेशात कमी दिवसात भरपूर उत्पादन देणाया आहेत. जुन्या जातीपेक्षा जवळ जवळ तिप्पट म्हणजेच सुमारे १८०० ते २००० किलोग्रॅमपर्यंत हेक्टरी उत्पादन देऊ शकतात.
२) टी-३६ - या जातीचे आयुर्मान मध्यम प्रकारचे असून बिया तांबूस पंरतु राखी रंगाच्या असतात. या जातीची लागवड सर्व भारतभर केली जाते.
३) डब्ल्यु-बी-८१ व डब्ल्यु बी-९४ या जातींच्या दाण्यांचा आकार मध्यम प्रतीचा असून रंग तपकिरी असतो. हेक्टरी ५०० ते ७५० किलोग्रॅम उत्पादन येते.