ज्वारी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे पारंपारीक व प्रचलित पीक आहे. पूर्वी ज्वारीला गरिबांचे अन्न म्हणत असत. परंतु, आज ज्वारी श्रीमंताच्या घरातील आवश्यक धान्य झाले आहे. सोयाबीनचा पेरा वाढल्याने ज्वारीचे क्षेत्र कमी होत गेले. त्यामुळे उत्पादन कमी होऊन चाराटंचाईचा प्रश्न उभा राहिला आहे
ज्वारी / जोंधळा /ज्वार ज्वारी हे मुख्यता उष्ण प्रदेशीय पिक आहे
दुष्काळी परिस्थिती व अति उष्णता असली तरी ज्वारी तग धरून राहू शकते. साधारणपणे २७-३२ डिग्री सेल्सीयस तापमानात ज्वारीची उत्तम वाढ होते. काही अंशी मातीतील क्षाराचे वाढलेले प्रमाण देखील ज्वारीचे पिक सहन करू शकते. पर्जन्यमान ३५० ते ७५० मिमी इतके आवश्यक आहे. खूप पाऊस हा पिकाच्या वाढीस हानिकारक ठरू शकतो. इतर पिकांच्या तुलनेत ज्वारीमध्ये, पानांतून बाष्पीभवनाद्वारे उडून जाणाऱ्या पाण्याची प्रक्रिया (ट्रान्सपीरेशन) खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रित केली जाते. या तंत्रामुळेच दुष्काळी परीस्थितीत देखील ज्वारी तग धरून राहते, व ओलावा मिळताच परत पिकाची वाढ सुरु होते. महाराष्ट्रातील मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते.ज्वारी ज्या भागात पिकविली जाते त्या भागातील गरीब लोकांचे ते आहारातील प्रमुख धान्य आहे. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
ज्वारीपासून दैनंदिन जेवणात बनवल्या जाणाऱ्या भाकरी शिवाय कोवळा हुरडा, आंबील, लाह्या, स्टार्च, ग्लुकोज व अल्कोहल देखील बनवले जाते. काही ज्वारीचे वाण हे फक्त हिरव्या चाऱ्याकरिता लावले जातात. ज्वारी उत्पादनाच्या बाबतीत देशभरात महाराष्ट्र अग्रेसर आहे, त्यानंतर कर्नाटक आणि मध्य प्रदेश यांचा क्रमांक लागतो. महारष्ट्रात उस्मानाबाद, नांदेड, परभणी, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर, सोलापूर, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात मुख्यता पिकवली जाते. महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात ज्वारी घेतली जाते.