तांदूळ लागवड करण्यापूर्वी
|
सन २०१६-१७ च्या आकडेवारीनूसार भात पिकाखालील क्षेत्र व उत्पादन खालीलप्रमाणे आहे.
जमीन व हवामान
उष्ण व दमट हवामान या पिकास पोषक आहे. जमिनीचा सामू ५ ते ८ या दरम्यान असावा. पर्जन्यमान ८०० मिलीमिटरहून अधिक असावे. पिकाच्या वाढीसाठी २५ ते ३५ सें.ग्रे. तापमान व ६५ ते ७० टक्केपेक्षा जास्त आर्द्रता पोषक असते. हलक्या ते मध्यम जमिनीबरोबरच खार जमिनीत देखील भाताचे पीक घेतले जाते.
लागवड पद्धती
ज्या ठिकाणी १००० मि.मि. पेक्षा जास्त पाऊस पडतो, अशा ठिकाणी या पद्धतीचा वापर केला जातो.
पेरणी पद्धत
अपारंपरिक विभाग, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र ज्या ठिकाणी मध्यम ते भारी जमिनी दिसून येतात त्याठिकाणी पाभर किंवा पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी केली जाते.
टोकण पद्धत
१००० मि.मि. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेश व मध्यम जमिनी असलेल्या भागात टोकण पध्दतीने लागवड केली जाते.
सुधारित वाण
हळवा वाण
निमगरवा वाण
गरवा वाण
सुवासिक वाण
खार जमिनीसाठी सुधारीत वाण
पेर भातासाठी सुधारीत वाण
संकरित वाण
बियाण्याची निवड व रोपवाटिका व्यवस्थापन बीजप्रक्रिया
सुधारित/संकरित वाणांचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषि विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडून खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. लावणी पद्धतीसाठी हेक्टरी ३० ते ४० किलो, पेरणी पद्धतीसाठी ७५ ते १०० किलो व टोकण पद्धतीसाठी ५० ते ६० किलो बियाणे वापरावे. संकरित जातींकरिता हेक्टरी २० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे थायरम चोळावे. खरीप हंगामासाठी भाताची पेरणी १५ मे ते १५ जूनपर्यंत गादी वाफ्यावर करावी. पेरणीकरीता १ मी. रुंदीचे, १५ सें.मी. उंचीचे आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे करावेत. एक हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीसाठी १० गुंठे क्षेत्रावरील रोपवाटीका पुरेशी होते. वाफे तयार करताना १ गुंठा क्षेत्रास २५० किलो शेणखत किंवा कंपोष्ट खत आणि १ किलो युरिया खत चांगल्या प्रकारे मातीत मिसळावे. पेरणी ओळीत व विरळ करावी. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसानी प्रतिगुंठा ५०० ग्रॅम नत्र द्यावे. टोकण पद्धतीत हळव्या जाती १५ x १५ सें.मी. आणि गरव्या व निमगरव्या जाती २० x १५ सें.मी. टाकाव्यात. पेरणी पद्धतीत २२.५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.
पुर्नलागवड
रोपांच्या पुर्नलागणीपूर्वी पारंपरिक पद्धतीने किंवा यंत्राच्या सहाय्याने चिखलणी करावी. हळव्या जातींची पुनर्लागवड पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी, निमगरव्या जातींची २३ ते २७ दिवसांनी व गरव्या जातींची २५ ते ३० दिवसांनी करावी.एका चुडात २ ते ३ रोपे ठेवावीत. संकरित जातींसाठी एका चुडात १ ते २ रोपेच ठेवावीत. योग्य वयाच्या रोपांची पुर्नलागवड हळव्या वाणांमध्ये १५ ४ १५ सेमी, निमगरव्या, गरव्या आणि संकरीत वाणांमध्ये २०४१५ सें.मी. वर करावी.
खत व्यवस्थापन
अ) रासायनिक खतांचा वापर :
भात लागवडीसाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याप्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे. ही खत मात्रा हळव्या जातींमध्ये लागणीच्यावेळी ५०% नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि ५०% नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावी; तर निमगरव्या व गरव्या जातींमध्ये लागणीच्यावेळी ४०% नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश, ४०% नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि २०% नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावी. संकरित जातींकरिता हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याप्रमाणात रासायनिक खतांच्या मात्रेची शिफारस करण्यात आली आहे. ही खत मात्रा लागणीच्यावेळी ५०% नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश, २५% नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि उर्वरित २५% नत्र लागणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावी.
ब) चार सूत्री भातशेतीचा अवलंब :
१) भात पिकाच्या अवशेषांचा (भाताच्या तुसाची राख ०.५ ते १.० किलो प्रति चौरस मीटर रोपवाटिकेमध्ये व भाताचा पेंढा २ टन प्रति हेक्टर पहिल्या नांगरटी वेळी) फेरवापर करावा.
२) गिरीपुष्पाचा पाला ३ टन प्रति हेक्टर चिखलणीच्यावेळी जमिनीत गाडावा.
३) भाताच्या सुधारित जातींच्या रोपांची नियंत्रित लावण जोडओळ पद्धतीने (लावणीचे अंतर १५-२५ X १५-२५ सें.मी.).
४) युरिया-डीएपी (६०:४०) प्रमाणात ब्रिकेट्सचा वापर (१७० किलो प्रति हेक्टर).
क) जैविक खतांचा वापर :
१) निळे हिरवे शेवाळ (२० किलो प्रति हेक्टर) भात लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी शेतात टाकावे.
२) अॅझोला (४ ते ५ क्विंटल प्रति हेक्टर) लागणीनंतर १० दिवसांनी शेतात टाकावे.
ड) हिरवळीच्या खतांचा वापर : हिरवळीचे खत जसे गिरीपुष्प, धैंचा, ताग इत्यादि सुमारे ३ ते ५ टन प्रति हेक्टर चिखलात गाडावे. याकरिता गिरीपुष्पाची लागवड शेताच्या बांधावर करून त्याच्या कोवळ्या फांद्या व पाला चिखलात गाडावा. ताग व धैंचा बियाणे हेक्टरी अनुक्रमे ३० व ४० किलो पेरावा आणि फुलोऱ्याच्यावेळी जमिनीत गाडावा.
आंतरमशागत
पेरणी व टोकण पद्धतीने लावणी केल्यास आवश्यकतेनुसार कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. लावणीनंतर भात खाचरामध्ये ५ ते ६ सें.मी. पाणी ठेवल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. तणाच्या बंदोबस्तासाठी ब्युटाक्लोर ५० ईसी किंवा बेंथिओकार्ब ५० ईसी हे तणनाशक १.५ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टर या प्रमाणात ५०० लिटर पाण्यात मिसळून भात लागणीनंतर एक आठवड्याच्या आत फवारणी करावी. तणनाशक फवारणीपूर्वी भात खाचरातील संपूर्ण पाणी काढून टाकावे व दुसऱ्या दिवशी पुन्हा पाणी शेतात भरावे. पुर्नलागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी मेटसल्फुरॉन मिथाईल १० टक्के क्लोरिम्युरॉन इथाईल १० टक्के याचे २० ग्रॅम विद्राव्य तयार मिश्रण (०.००४ किलो क्रियाशील घटक) प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे आणि ४५ दिवसांनंतर एक खुरपणी करावी किंवा पुर्नलागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी २०० मिली बायस्पॅरीबँक सोडीयम १०% एस.सी. प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे आणि पूर्नलागवडीनंतर ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
पेर भात शेतीमध्ये प्रभावी तण नियंत्रण व आर्थिक फायद्यासाठी पेरणीनंतर दोन ते तीन दिवसांत ६४० मि.ली. ऑक्झिप्लोरफेन २३.५ ई.सी. (०.१५० किलो क्रियाशील घटक) प्रती हेक्टर आणि पेरणीनंतर २५ दिवसांनी मेटसल्फ्युरॉन मिथाईल १० टक्के +क्लोरिम्युरॉन इथाईल १० टक्के याचे २० ग्रॅम विद्राव्य तयार मिश्रण (०.००४ किलो क्रियाशील घटक) प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे अथवा पेरणीनंतर २ ते ३ दिवसात १५०० मिली प्रेटीलाक्लोर ३०.७ ई.सी. प्रति हेक्टर आणि पेरणीनंतर २५ दिवसांनी ७० ग्रॅम अॅझीमसल्फूरॉन ५० टक्के डी.एफ. प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पाणी व्यवस्थापन
पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी पुढीलप्रमाणे असावी.
(१) रोप लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत १ ते २ सें.मी.
(२) रोपांच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत २ ते ३ सें.मी.
(३) अधिक फुटव्याच्या अवस्थेत ३ ते ५ सें.मी.
(४) भात पोटरीच्या अवस्थेत ५ ते १० सें.मी.
(५) फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत १० सें.मी.
(६) कापणीपूर्वी १० दिवस अगोदर पाण्याचा निचरा करावा.
आंतरपिके
पेरणी पद्धतीने भाताची लावण केल्यास त्यामध्ये घेवडा, सोयाबीन, ताग यासारखी आंतरपिके घेता येतात.
पीक संरक्षण
भात पिकावर खोडकिडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, तुडतुडे, भुंगेरे इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. भात पिकाच्या कापणीनंतर नांगरट करून काडीकचरा, धसकटे गोळा करून नाश करावीत जेणेकरून किडींच्या व रोगांच्या नियंत्रणास मदत होते. पिकांच्या फेरपालटामुळे देखील कीड, रोग नियंत्रणास बऱ्याच प्रमाणात मदत होते. खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी पुनर्लागण वेळेवर करावी. शक्य असल्यास पुनर्लागणीपूर्वी रोपांची मुळे क्यलोरोपायरीफॉस ०.१% द्रावणात १२ तास बुडवून ठेवावीत. तपकिरी तुडतुडे, खोडकिडीसाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल. १२५ मिली किंवा फिप्रोनिल ५ % एस.सी. १५०० मिली प्रति ५०० लिटर पाण्यात हेक्टरी फवारणी करावी. पाने गुंडाळणारी अळी, खोडकिडा, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५ टक्के २५० मिली किंवा अॅसेफेट ७५ टक्के एस.पी. ६०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी. लष्करी अळी व लोंबीतील ढेकण्याच्या नियंत्रणासाठी मिथील पॅराथिऑन २ टक्के भुकटी प्रति हेक्टरी २५ किलो धुरळणी करावी. खोडकिडीच्या जैविक नियंत्रणासाठी “ट्रायकोग्रामा जापोनिकम' या प्रजातीचे १ लक्ष प्रौढ प्रति हेक्टरी आठवड्याच्या अंतराने पीक लागणीनंतर एक महिन्यांनी चार वेळा प्रसारीत करावीत. पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस' या प्रजातीचे एक लक्ष प्रौढ प्रति हेक्टर आठवड्याच्या अंतराने वरील प्रमाणे चार वेळा प्रसारीत करावेत. खाचरात खेकड्यांच्या बंदोबस्तासाठी हंगामाचे सुरवातीला विषारी अमिष वापरावे. त्यासाठी कार्बारील ५० टक्के डब्ल्यु.पी. ५० ग्रॅम किंवा अॅसिफेट ७५ टक्के एस.पी. ७५ ग्रॅम हे. १ किलो शिजवलेल्या भातामध्ये मिसळून गोळ्या तयार करून खेकड्यांच्या बिळामध्ये टाकाव्यात व बिळे बंद करावीत. उंदराच्या नियंत्रणासाठी शेताची खोल नांगरट करून बांधाची छटाई करावी व जुनी बीळे नष्ट करावीत. या बरोबरच १० ग्रॅम झिंक फॉस्फाईड २.५ टक्के १० मिली खाद्यतेलात मिसळून ३८० ग्रॅम भरड धान्यात एकत्रित करून गोळ्या कराव्यात व त्या विषारी अमिष म्हणून वापराव्यात.
भात पिकातील महत्त्वाचे रोग म्हणजे करपा, पर्णकुजवा, पर्णकरपा, दाणे रंगहिनता, कडाकरपा, आभासमय काजळी इत्यादी आहेत. रोग नियंत्रणासाठी रासायनिक खतांचा वापर शिफारशीत मात्रेप्रमाणेत करावा. नत्रयुक्त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकू नयेत. अन्यथा करपा रोगाचे प्रमाण वाढते, खाचरात पाणी साचु न देता ते वाहते ठेवावे. रोग दिसताच पुढील प्रमाणे बुरशीनाशकांच्या फरावरण्या २ ते ३ आवश्यकतेनुसार द्रावणात स्टीकर १० मिली टाकून कराव्यात. कडा करपा सोडून इतर रोगांच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड ५० % हेक्टरी १२५० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम ५० % हेक्टरी ५०० ग्रॅम प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे. कर्पा आणि पर्णकोष कुजव्या रोगांच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० % डब्ल्यु पी. ६.५ ग्रॅम किंवा हेक्साकोनाझोल ५ टक्के इ.सी. २० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. तपकिरी ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिनेब ७० % डब्ल्यु. पी. ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. करपा, पर्ण कोष करपा आणि दाणे रंगहिनता या रोगांच्या नियंत्रणासाठी टेब्यूकोनॅझोल ५० % + ट्रायफ्लॅक्झिसट्रोबिन कॉपर हायड्रॉक्साईड ५३.८ % डी.एफ. ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून वापरावे. आभासमय काजळी आणि उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या काढून त्यांचा नाश करावा. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी रोगनियंत्रण एकत्रितपणे करावे.
कापणी, मळणी आणि साठवण
भाताच्या लोंब्यामधील ८० ते ९० टक्के दाणे पक्व झाल्याचे दिसताच पिकाची कापणी वैभव विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. यंत्राच्या सहाय्याने कापणी केल्यास वेळेत व खर्चातही बचत होऊ शकते. कापलेला भात वाळण्यासाठी १-२ दिवस पसरुन ठेवावा व नंतर मळणी करावी. चांगला उतारा मिळण्यासाठी मळणीयंत्र वापरावे. दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्के होईपर्यंत भात वाळवावा. नंतर वाळवून कोरड्या, स्वच्छ व सुरक्षित जागी धान्याची साठवण करावी.