शेवगा वेळापत्रक

महाराष्ट्रात ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू आहे. यातील बऱ्याचशा जमिनी हलक्या बरड आणि नापीक म्हणून पडून आहेत. अशा जमिनीत शेवग्याची लागवड निश्चितच फायदेशीर ठरेल. कारण शेवगा पावसाच्या पाण्यावर येऊ शकतो.

हवामान व जमीन
शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे ताण चांगला बसत नाही. त्यामुळे फुलांचे आणि शेंगांचे प्रमाण कमी होते.

जाती
तामिळनाडू कृषि विश्वविद्यालय, कोईमतूर या संस्थेने कोईमतूर-१, कोईमतूर-२, पि. के. एम-१ आणि पी. के. एम.२ या लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असलेले वाण प्रसारित केलेले आहेत. तसेच कोकण कृषि विद्यापीठाने कोंकण रुचिरा वाण प्रसारित केलेला आहे. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच असून झाडास १६ ते २२ फांद्या असतात तसेच बागलकोट (कर्नाटक) येथील विद्यापीठाने भाग्या\' ही जात चांगल्या उत्पादनासाठी विकसीत केली आहे.

लागवड
व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड करावयाची असल्यास पावसाच्या पूर्वी ६० सें.मी. लांब, रुंद आणि खोल खड्डे घ्यावेत. लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर ३४३ मीटर ठेवावे. शेताच्या बांधावर लागवडीसाठी ३ ते ४ मीटर अंतर ठेवावे. शेवग्याची अभिवृध्दी फाटे कलम व बियापासून रोपे तयार करून केली जाते. परंतु बियाणापासुन लागवड केल्यास मातृवृक्षाप्रमाणेच गुणधर्म असलेली झाडे मिळू शकत नाहीत. तसेच बिया लागवडीपासून केलेल्या झाडापासून शेंगा फाटेकलमापेक्षा ३ ते ४ महिने उशिरा मिळतात. फाटे कलमापासून लागवडीसाठी ५ ते ६ सें.मी. जाडीच्या सुमारे १ ते १.२५ मीटर लांबीच्या फांद्या वापरतात.

लागवडीचा हंगाम
कमी पावसाच्या प्रदेशात (खरिपात) जून-जुलै मध्ये पहिल्या पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो. हवेतील आर्द्रता वाढते. अशी हवा फाटे कलम फुटण्यास किंवा रोपे रुजण्यास अनुकूल असते. तेव्हा याचवेळी लागवड करावी. फाटे कलम अथवा रोपे लावल्यावर त्याच्या जवळील माती पायाने चांगली दाबावी व हातपाणी द्यावे. लावडीनंतर ६ ते ८ महिने गरज पडेल तेव्हा पाणी देऊन झाडे जगवावी.

लागवडीनंतर घ्यावयाची काळजी
शेवगा लागवडीनंतर आवश्यक महत्वाच्या बाबी म्हणजे आंतरमशागत, प्रमाणित खतांचा वापर, झाडाची योग्य छाटणी या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. आंतरमशागत करावी लागत नाही. तरीसुध्दा झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावीत. तसेच दोन झाडाच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणाचा उपद्रव होणार नाही. शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते. शेवग्याला प्रतिवर्षी प्रत्येक झाडास पावसाच्या सुरुवातीस १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१२ ग्रॅम सुपर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे. व्यवस्थित आकार दिला नाहीतर झाड उंच वाढते. त्यामुळे शेंगा काढणी अवघड जाते. यासाठी लावडीनंतर चार महिन्यांनी पहिली छाटणी करावी. यावेळी खोड जमिनीपासून १ मीटर अंतरावर छाटावे आणि चार दिशाला चार फांद्या वाढू द्याव्यात. झाडाची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाईल. त्यानंतर ७ ते ८ महिन्यांनी चारीही फांद्या मुख्य खोडापासून एक मीटर अंतरावर छाटाव्यात. त्यामुळे झाडाचा मुख्य आराखडा तयार होईल व झाडाची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाईल व उत्पादन वाढेल. पुढे झाड जसजसे जुने होईल तसतसे दर दोन वर्षांनी एप्रिल मे महिन्यात शेंगा निघाल्यावर छाटणी करावी म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल.

काढणी व उत्पादन
लागवडीपासून सुमारे ८ ते १० महिन्यांनी शेंगा मिळू लागतात. पूर्ण वाढीच्या आणि ज्यांचा पीळ पूर्ण उलगडला आहे अशा शेंगा लांबीनुसार जुळवून घ्याव्यात. प्लास्टीक कागद गोणपाटावर गुंडाळल्यास शेंगाचा तजेला जास्त काळ टिकून राहतो. एक वर्षानंतर दरवर्षी एक चांगल्या झाडापासून सुमारे २५ ते ५० किलो शेंगा मिळतात.