गाजर लागवडीसाठी जमीन कशी असावी
|
हवामान व जमीन
गाजराच्या उत्तम वाढीसाठी 18 ते 24 अंश से. तापमान अतिशय पोषक आहे. जास्त तापमानात गाजराची वाढ खुंटते, तर कमी तापमानाला लांबी वाढते. लागवडीसाठी निवडलेली जमीन मऊ आणि भुसभुशीत असावी. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू सहा ते सात असावा. जास्त आम्लवर्गीय जमिनीत गाजराची प्रत खालावते.
सुधारित वाण
1.आशियायी जाती
या जाती उष्ण हवामानात चांगल्या येतात. या जातीचा रंग तांबडा, काळसर पिवळा असतो. गाजरे आकाराने मोठी असून आतील कठीण गाभा मोठा असतो. या जातीची गाजरे वरती जाड आणि टोकावडे निमुळते असतात. गाजरावर तंतूमुळे अधिक असतात. या जातीमध्ये 'अ' जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी असते. मात्र ही गाजरे चवीला गोड असून जास्त रसाळ असतात. या जातीचे बी महाराष्ट्रात तयार होऊ शकते.
ऊदा-पुसा केशर, पुसा मेघाली, सिलेक्शन 229, इ.
2.युरोपीय जाती
थंड हवामानात वाढणाऱ्या या जाती द्विवर्षायू असतात. या गाजराचा रंग केशरी किंवा नारंगी असून आकाराने सारख्या जाडीचे असतात. या जातींच्या पानांची वाढ कमी असते. गाजरे खाताना कोरडी लागतात. लवकर काढणीला तयार होतात. या जातींचे बी भारतात तयार होत नाही.
ऊदा- नँटेज, चॅटनी, पुसा जमदग्नी, इ.
लागवड
गाजराची लागवड डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी निवडलेली जमीन खोल उभी-आडवी नांगरून घ्यावी. शेवटच्या पाळीपूर्वी जमिनीत एकरी 10 ते 12 गाड्या शेणखत चांगले मिसळून घ्यावे. पाट्याने शेतातील माती सपाट करून घ्यावी.
एक एकर क्षेत्रासाठी एक ते दीड किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्यात भिजून ठेवल्यास उगवण चांगली व कमी कालावधीत होते. पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. पाभरीने पेरणी केल्यास दोन ओळींत 30 ते 45 सें.मी. अंतर ठेवावे. नंतर विरळणी करून दोन रोपांत 8 सें.मी. अंतर ठेवावे. बी उगवून येण्यास 12 ते 15 दिवस लागतात.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन
गाजर पिकाला एकरी 32 किलो नत्र, 24 किलो स्फुरद आणि 24 किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीपूर्वी द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा लागवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी. गाजरात मुळे तडकणे आणि कॅव्हिटी स्पॉट यांसारख्या विकृती आढळतात. त्यासाठी पिकाला नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळावा. जमिनीस माती परीक्षणानुसार कॅल्शिअमचा पुरवठा करावा.
सिंचन व्यवस्थापन
बियांची उगवण चांगली होण्यासाठी पेरणीपूर्वी शेत ओलावून नंतर वाफशावर बी पेरावे, लगेच हलके पाणी द्यावे. उगवण होईपर्यंत पाणी देताना पाण्याचा प्रवाह कमी ठेवावा. हंगामाप्रमाणे हिवाळ्यात सात ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी वारंवार दिल्यास पानांची वाढ जास्त होऊन गाजर चांगले पोसत नाहीत आणि चवीला पाणचट लागते. तंतूमुळांची वाढ जास्त होते. सिंचन पाणी नियंत्रित व नियमित द्यावे.
आंतर मशागत
रोपे तीन ते चार सें.मी. उंचीची झाल्यावर विरळणी करावी. नियमितपणे खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पाल्याची वाढ मर्यादित ठेवून मुळांची वाढ जोमदार होण्यासाठी उगवणीनंतर 50 दिवसांनी 500 पीपीएम सायकोसील संजीवक फवारावे. गाजर काढण्यापूर्वी 15-20 दिवस पाणी देणे बंद करावे. त्यामुळे गाजरात गोडी निर्माण होते.