गहू काढणी व मळणी
|
महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. या पिकाखाली सन २०१६-१७ मध्ये १०.७३ लाख हेक्टर क्षेत्र होते व त्यापासून १६.७२ मे. टन उत्पादन मिळाले. महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १५५८ किलो प्रति हेक्टरी आहे. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३१.७२ क्वि./ हेक्टर) तुलना करता राज्याची उत्पादकता फारच कमी आहे. महाराष्ट्रातील गव्हाचे कमी उत्पादन येण्याची कारणे म्हणजे कोरडवाहू गव्हाची लागवड, पाणीपुरवठा पीक अवस्थेनुसार न करणे, सुधारित वाणांचा वापर न करणे, पीक संरक्षणाचा अभाव, मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे आणि गव्हाची उशिरा पेरणी करणेही आहेत.
जमीन
बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. तथापि, मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल, जिरायत गहमात्र जास्त पाऊस पडणाऱ्या व जमिनीत ओलावा टिकवून धरणाऱ्या भारी अशा जमिनीतच घ्यावा. शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.
मशागत
गहू पिकाच्या मुळया जमिनीत ६० ते ७५ सें.मी. खोलवर जातात. म्हणून या पिकासाठी चांगली भुसभुसीत जमिनीची निवड करावी. त्यासाठी जमिनीची योग्य व पुरेशी मशागत करणे अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्रात गव्हाची लागवड खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर करतात. खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने १५ ते २० से नांगरावी. त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळया देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर १०ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत / कंपोस्ट खत पसरवून टाकावे. तसेच पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
सुधारित वाण
पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे तसेच मशागतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन ४८२ किलोवरून १२९२ किलोपर्यंत वाढले आहे. महाराष्ट्र राज्याच्या काही भागात भात पिकानंतर गव्हाची पेरणी करतात. अशा पीक पध्दतीत गहू घ्यावयाचा असल्यास आणि २-३ पाण्याच्या पाळयांची सुविधा असल्यास निफाड-३४ हा उशिरा पेरणीसाठी फार चांगला वाण आहे. त्यामुळे या वाणाची शिफारस बागायती उशिरा पेरणीसाठी करण्यात आलेली आहे. एन आय ए डब्ल्यू-३०१ (त्र्यंबक), एन आय ए डब्ल्यू-९१७ (तपोवन), एम ए सी एस-६२२२ हे सरबती वाण व एन आय डी डब्ल्यू-२९५ (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा. बागायती उशिरा पेरणीसाठी एन आय ए डब्ल्यू-३४ आणि एके ए डब्ल्यू-४६२७ या वाणाप्रमाणेच जिरायत पेरणीसाठी एन आय डी डब्ल्यू-१५ (पंचवटी) एकेडी डब्ल्यू-२९९७-१६ (शरद) हे वाण उपयुक्त आहेत. पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एन.आय.ए.डब्ल्यू-१४१५ (नेत्रावती) व एच.डी. २९८७ (पुसा बहार) या सरबती वाणांची लागवड करावी. वरीलप्रमाणे पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणांचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल.
पेरणीची वेळ
जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवडयात करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची पेरणीसुध्दा उशिरा करता येते. परंतु वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवाड्यास हेक्टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते व त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.
बियाणे
गव्हाच्या अधिक उत्पादनाकरीता दर हेक्टरी २० ते २२ लाख रोपांची संख्या शेतात असणे आवश्यक आहे. ही संख्या मिळविण्यासाठी दर हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे. उशिरा पेरणीसाठी दर हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे. जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ७५% डब्ल्यु. एस. या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी तसेच प्रती १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५० ग्रॅम पीएसबी या जिवाणू संवर्धन खताची बीजप्रक्रीया करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
गह बियाण्याचे साठवणुकीच्या कालावधीमध्ये नऊमहिन्यापर्यंत किड (दाण्यातील भुंगेरे) नियंत्रण होऊज ऊगवण क्षमता प्रमाणिकरण माणकापेक्षा (८५ टक्के) अधिक राखण्यासाठी बियाण्यास डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ४ मिली. किंवा ल्युफेन्यूरॉन ५ टक्के प्रवाही १० मिली. किंवा ईमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के विद्राव्य दाणेदार ४ ग्रॅम ५०० मिली. पाण्यात मिसळून किंवा डायटोमॅसीयस अर्थ अधिक मॅग्नेशियम सल्फेट प्रत्येकी ५०० ग्रॅम प्रती १०० किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करण्याची शिफारस केली आहे.
गहू पिकावरील मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडींच्या नियंत्रणासाठी गहू बियाण्याला थायोमिथोक्झाम ३० टक्के एफ एस७.५० मिली प्रती १० किलो बियाणे प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया करावी.
पेरणी
पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन ओलवावी व वापसा आल्यावर जमीन कुळवावी. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी दोन ओळीत २० सें.मी. व उशिरा पेरणी १८ सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे ५ ते ६ सें.मी. खोल करावी त्यामुळे उगवण चांगली होते. जिरायत गव्हाची पेरणी दोन ओळीत २० सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजून न करता ती एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेज गव्हासाठी २.५ ते ४ मीटर रुंदीचे व ७ ते २५ मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.
खते व्यवस्थापन
बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दयावे. बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी दर हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश दयावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फूरद आणि पालाश पेरणीच्यावेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ आठवडयांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे. उशिरा केलेल्या पेरणीसाठी हे प्रमाण हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश इतके दयावे. निम्मे नत्र व स्फूरद आणि पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ आठवडयांनी दयावे.
िरायत गव्हासाठी पेरणीच्या वेळेस हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद पेरून दयावे. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के युरीयाची फवारणी करावी. पश्चिम महाराष्ट्रातील मैदानी खोल काळया जमिनीवर गव्हाच्या उत्पादनाकरीता पेरणीपूर्वी प्रती हेक्टर १ टन शेणखत देवून गव्हाची पेरणी जोड ओळीत (१५ ते ३० सें.मी.) करून प्रती हेक्टर ७०:३५ नत्र-स्फुरद किलो, युरिया-डीओपी ब्रिकेट मार्फत (२.७ ग्रॅम वजनाची ब्रिकेट) १५ सें.मी. अंतराच्या जोड ओळीत प्रत्येकी ३० सें.मी. अंतरावर १० सें.मी. खोल खोचावी.
पश्चिम महाराष्ट्राच्या मैदानी प्रदेशातील लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये गव्हाचे अधिक उत्पादन, अर्थिक फायदा व जमिनीतील लोहाची पातळी राखण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांसोबत (१२०:६०:४० नत्रःस्फुरदःपालाश किलो प्रती हेक्टर अधिक १० टन शेणखत प्रती हेक्टरी, मुरविलेले हिराकस २० किलो प्रती हेक्टरी (१०० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून) जमिनीतून दयावे.
महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन २ % १९:१९:१९ नत्र : स्फुरद : पालाश या विद्राव्य खताची किंवा २% डि.ए.पी. या खतांची पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसानंतर फवारणी करावी. वेळेवर पेरणीसाठी १२०:६०:४०, तसेच उशीरा पेरणीसाठी ९०:६०:४० नत्रःस्फुरदःपालाश कि./हे. द्यावे. विद्राव्य खत फवारणीसाठी २ % द्रावणाकरीता २०० ग्रॅम १९:१९:१९ किंवा डी.ए.पी.खते १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पश्चिम महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादन लक्ष ४५ चे ५० क्विंटल प्रति हेक्टर साध्य करण्यासाठी जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी व संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी खालील शेणखतासोबत अथवा शेणखत विरहित उत्पादन उद्दिष्ट समिकरणांचा वापर करावा.
शेणखतासोबत अपेक्षित उत्पादन समीकरण
खतामधून द्यावयाचे नत्र कि./हे. = (७.४२ x अपेक्षित उत्पादन टन/हे) - (०.८८ x जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.) - (२.४५ x शेणखत टन/हे.)
खतामधून द्यावयाचे स्फुरद कि./हे. = (१.७९४ अपेक्षित उत्पादन टन /हे.) - (१.४७ ४ जमिनीतील उपलब्ध स्फुरद कि./हे.) - (०.३३ x शेणखत टन /हे.)
खतामधून द्यावयाचे पालाश कि./हे. = (४.७७ x अपेक्षित उत्पादन टन/हे.) - (०.४७४ जमिनीतील उपलब्ध पालाश कि./हे.) - (०.६५ x शेणखत टन/हे.)
शेणविरहित अपेक्षित उत्पादन समीकरण
खतामधून द्यावयाचे नत्र कि./हे. = (८.०९४ अपेक्षित उत्पादन टन/हे.) - (०.९६ ४ जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.)
खतामधून द्यावयाचे स्फुरद कि./हे. = (२.२६ x अपेक्षित उत्पादन टन/हे.) - (१.८६ - जमिनीतील उपलब्ध स्फुरद कि./हे.)
खतामधून द्यावयाचे पालाश कि./हे. = (५.५४ x अपेक्षित उत्पादन टन/हे.) - (०.५४ ४ जमिनीतील उपलब्ध पालाश कि./हे.)
पाणी व्यवस्थापन
गव्हाची पेरणी शेत ओलवून वापसा आल्यावर करावी. पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळया दयाव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी दयावे लागते. पीक वाढीच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे फायदेशीर ठरते.
१. मुकुटमुळे फुटण्याची अवस्था : पेरणीनंतर १८ ते २१ दिवस
२. कांडी धरण्याची अवस्था : पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस
३. फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था : पेरणीनंतर ६० ते ६५ दिवस
४. दाणे भरण्याची अवस्था : पेरणीनंतर ८० ते ८५ दिवस
पाणीपुरवठा अपुरा असल्यास काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळया पुढीलप्रमाणे दयाव्यात.
१. गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी दयावे.
२. गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२, दुसरे पाणी ४० ते ४२ व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी दयावे.
अपुरा पाणीपुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणे शक्य आहे त्या क्षेत्रात पंचवटी (एन आय डी डब्ल्यु-१५) किंवा नेत्रावती (एन आय ए डब्ल्यू-१४१५) गव्हाच्या वाणांचा वापर करावा. गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते व दोन पाणी दिले तर उत्पादनात २० टक्के घट येते.
आंतरमशागत
गव्हात चांदवेल, हरळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरीता जरूरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. गहू पिकातील अरूंद पानांचे आणि रूंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी दरहेक्टरी आयसोप्रोटयुरॉन (५०%) दोन ते तीन किलो किंवा मेटसल्फ्यूरॉन मथाईल (२०%) हेक्टरी २० ग्रॅम किंवा २, ४-डी (सोडीयम) अधिक २ टक्के युरिया ६०० ते १२५० ग्रॅम ६०० ते ८०० लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या २ ओळीत फवारावे. तणनाशक फवारल्यानंतर १० ते १२ दिवस पाणी देऊ नये.
पीक संरक्षण
गह या पिकास तांबेरा व उंदीर यांच्यापासून जास्त नुकसान पोहचते. काळा व नारंगी तांबेरा हे दोन्ही महत्वाचे हानीकारक रोग आहेत. काळया तांबेऱ्यामुळे उत्पादनात २० ते ६० टक्के घट येते. नारंगी तांबेऱ्यामुळे काळया तांबेऱ्यापेक्षा नुकसान कमी होते. विदयापीठाने विकसीत केलेल्या तांबेरा प्रतिबंधक वाणांचीच पेरणीसाठी निवड करावी. तांबेरा प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करावी. पिकास पाणी जरूरी पुरतेच व बेताचे दयावे. तांबेरा दिसू लागताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशके १.५ किलो ५०० लिटर पाण्यातून फवारावे. जरूरी भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी.
गव्हावर करपा रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येतो. करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाचे लक्षणे दिसू लागताच मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.
मावा या किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम २५ डब्ल्यूजी ५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. गहू बियाणे साठवणुकीच्या काळात सोंडेकिडीच्या नियंत्रणासाठी, उन्हात वाळविलेल्या बियाण्यास प्रती किलो १० ग्रॅम याप्रमाणे वेखंड भुकटीची बीजप्रक्रिया करावी.
कापणी व मळणी
पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कापणीस उशीर झाल्यास एन आय-५४३९ व त्र्यंबक (एन आय ए डब्ल्यू३०१) या गव्हाच्या वाणाचे दाणे शेतात झडू शकतात. म्हणून पीक पक्व होण्याच्या २-३ दिवस. अगोदर कापणी करावी. कापणीच्यावेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. गव्हाची मळणी, यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापण व मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने करावी.
उत्पादन
गव्हाचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी पेरणीच्या वेळेनुसार योग्य वाणांचा वापर, योग्य रितीने पेरणी, बियाण्याचे प्रमाण, खतांचा समतोल वापर, पाण्याच्या योग्यवेळी पाळया, आंतरमशागत व पीक संरक्षण या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. वरीलप्रमाणे गव्हाची बागायती वेळेवर लागवड केल्यास हेक्टरी ४५ ते ५० क्विंटल, बागायती उशिरा लागवड केल्यास ३५ ते ४० क्विंटल व जिरायत लागवड केल्यास १२ ते १४ क्विंटल उत्पादन मिळते.
नवीन प्रसारीत वाण
फुले समाधान बहुगुणी गहू वाण (एन. आय. ए. डब्ल्यू. १९९४)
महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर (१ ते १५ नोव्हेंबर) तसेच उशिरा (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर) पेरणीसाठी सरबती गव्हाचा समाधान (एन. आय. ए. डब्ल्यू. १९९४) हा वाण प्रसारित करण्यात आला आहे.
१.महाराष्ट्रातील बागायत क्षेत्रात वेळेवर किंवा उशिरा अशा दोन्ही कालावधीत पेरणीसाठी एन आय ए डब्ल्यू-१९९४ सरबती गव्हाचा हा एकमेव वाण आहे. वेळेवर पेरणीखाली उत्पन्न ४६.१२ क्विंटल / हेक्टर तर उशिरा पेरणीखाली उत्पन्न ४४.२३ क्विंटल / हेक्टर.
२. तपोवन, एम एसी एस-६२२२, एन आय ए डब्ल्यू-३४ व एचडी-२९३२ या तुल्य व प्रचलित वाणांपेक्षा सरस.
३. तांबेरा रोगास तसेच मावा किडीस देखील प्रतिकारक्षम.
४. टपोरे व आकर्षक दाणे, हजार दाण्याचे वजन ४३ ग्रॅम, प्रथिनांचे प्रमाण १२.५ ते १३.८ टक्के, चपातीची प्रत उत्कृष्ट = प्रचलित वाणांपेक्षा सरस.
५. प्रचलित वाणांपेक्षा ९ ते १० दिवस लवकर येतो.
शिफारसी
गव्हाचे अधिक उत्पादन तसेच पाण्याचा व खताचा कार्यक्षम वापर होऊज आर्थिकदृष्टया फायदेशीर उत्पन्न मिळविण्यासाठी शिफारशीत खत मात्रा (१२०:६०:४० नत्रःस्फुरदःपालाश कि./ हे.) विद्राव्य स्वरूपातील खतामधून तक्त्याप्रमाणे १३ आठवडयाच्या हप्त्यातून ठिबक सिंचनातून देण्याची तसेच २ टक्के युरिया किंवा डायअमोनियम फॉस्फेटच्या तीन फवारण्य लागवडीनंतर ३०,४५ आणि ६० दिवसांनी शिफारस करण्यात येत आहे. * बन्सी प्रकारच्या गव्हाच्या वाणापासून (गोदावरी) उत्तम प्रतीच्या लाहया तयार करण्याकरीता पुढील प्रमाणे प्रक्रिया
तक्ता
ठिबक सिंचनातून गहू पिकास १२ हप्त्यातून अन्नद्रव्ये देण्याचे प्रमाण
शिफारस करण्यात येत आहे.
१. गहू तीन दिवस पाण्यात भिजवल्यानंतर उकळत्या द्रावणात (खाण्याचा सोडा व मीठ प्रत्येकी १.५ टक्के) १ तास भिजत ठेवावे व नंतर १२ ते १४ टक्के ओलावा येईपर्यंत वाळवावे.
२. पूर्वप्रक्रिया केलेल्या गव्हापासून २२० ते २४० अंश सेल्सीयस तापमानास लाहया तयार कराव्यात.
३. लाहयांपासून चिवडा तयार करून प्लॅस्टिकच्या पिशवीत सामान्य तापमानास १ महिना साठविता येतो.
गव्हाच्या अधिक तापमान प्रतिकार क्षमतेस कारणीभूत असलेल्या प्रयोगशाळेतील चाचण्या तसेच जैव रासायनिक बदलांचा तुलनात्मक अभ्यास करता गव्हाचे एन.आय.ए.डब्ल्यू.-९१७ हे वाण अजैविक ताण व्यवस्थापनासाठी शिफारस करण्यात आला आहे.