गांडूळ खत प्रकल्प

गांडूळ खत प्रकल्प

गांडूळाला दानवे, वाळे अथवा केचवे या नावाने ओळखतात, तर इंग्रजीत ‘अर्थवर्म' म्हणतात. नाजूक, मऊ, गुळगुळीत शरीराचा जंतासारखा आकार असणारा हा प्राणी ६ सें.मी. पासून ते ६० सें.मी. पर्यंत लांब असतो. हा रंगाने तांबूस, तपकिरी, लालसर किंवा पांढरट असतो. गांडूळाच्या अंडी, अपूर्ण व पूर्ण अवस्था अशा तीन प्रमुख अवस्था असून, त्या ओलसर जमिनीत पूर्ण होतात. गांडुळ कोरड्या मातीत अथवा पाण्यात जगू शकत नाही. याचे आयुष्य प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असते. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे इसिनिया फोयटीडा नावाच्या गांडुळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला. या जातीच्या गांडुळाचे अंडीपुंज मुगाच्या दाण्याच्या आकाराचे असून हिरवट पिवळसर रंगाचे असते. त्यात २ ते ६ अंडी असतात. अंडी १५ ते २० दिवसांत उबवल्यावर त्यातून गांडूळाची पिल्ले बाहेर येतात. फक्त २ ते ३ पिल्लेच पौढावस्थेत पोहचतात. ४० ते ६० दिवसांत पिल्लांची पौढावस्था पूर्ण होते. वयात आलेल्या गांडुळाच्या तोंडापासून २ ते ३ सें. मी. अंतरावर अर्धा सें. मी. आकाराचा भाग जाड होतो. या पूर्ण अवस्थेत तो प्रत्येक आठवड्यात एक अंडीपुंज या प्रमाणे अंडी घालतो. या जातीच्या गांडुळाचे आयुष्य २ ते ३ वर्षे असते.

गांडूळ खत पैदास करण्याचे तंत्र
गांडुळ पैदास करण्यासाठी इसिनिया फोयटीडा या विदेशी जातीचा वापर करावा. तसेच गांडुळाच्या खड्ड्यावर दिवसभर सावली राहिल, याप्रमाणे छप्पर करावे. साधारणपणे २,००० गांडुळे खड्ड्यांमध्ये सोडून त्यांच्यापासून प्रजनन, तसेच गांडूळखत (व्हर्मिकंपोस्ट) मिळविण्यासाठी जमिनीमध्ये २० सें.मी. खोलीचा १ मीटर लांब व ६० सें. मी. रुंद असा खड्डा खोदावा. या खड्ड्यांमध्ये अर्धे कंपोस्ट खत व अर्धे अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजेच पालापाचोळा मिसळून खड्डा भरावा. म्हणजेच हा गादी वाफा तयार होईल. हे खाद्य अंदाजे २०० कि.ग्रॅ. होते. या गादी वाफ्यामध्ये २,००० गांडुळे सोडावीत. गांडुळे सोडल्यानंतर या गादीवाफ्यावर गोणपाटाचे आच्छादन करून त्यावर दिवसातून ३ वेळा पाणी शिंपडावे. अशाप्रकारे गांडुळ खत (व्हर्मिकंपोस्ट) तयार होते. हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडुळखत बाजूला करावे. शक्यतो खत वेगळे करतांना अवजाराचा (टिकाव, खोरे, खुरपे इ.) वापर करू नये. त्यामुळे गांडुळांना इजा पोहचते. पूर्ण वाढ झालेली गांडुळे वर नमुद केल्याप्रमाणे पुन्हा गादी वाफ्यात सोडावीत. या गांडुळ खतामध्ये गांडुळाची अंडी, त्यांची विष्टा, कुजलेले खत व माती यांचे मिश्रण असते. हे गांडुळ खत शेतामध्ये खत म्हणून वापरता येते किंवा छोट्या खड्ड्यांमध्ये पालापाचोळा, शेणखत, माती यांचे मिश्रण टाकून त्यात मिसळून द्यावे. तेथे गांडुळांची पैदास सुरू होते. परंतु हा खड्डा नेहमी ओलसर ठेवावा. इसिनिया गांडूळ देशी गांडूळासारखे जमिनीत खोलवर जात नाहीत. म्हणून ते खत करण्यासाठी उपयुक्त आहेत.

गांडूळाचे शेतीसाठी फायदे
1. गांडुळामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
2.मातीच्या कणांच्या रचनेत उपयुक्त बदल घडविला जातो.
3.गांडुळाची विष्टा म्हणजे एक उत्तम प्रकारचे खत आहे, याला 'ह्यूमस' असे म्हणतात. यातून झाडाच्या वाढीसाठी लागणारे स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना सहजासहजी व ताबडतोब उपलब्ध होतात.
4.जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
5.जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व पाण्याचे बाष्पीभवन फारच कमी होते.
6.जमिनीची धूप कमी होते.
7.जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.
8.गांडुळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
9.उपयुक्त जिवाणूच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ होऊन वरखते आणि पाण्याच्या खर्चात बचत होते.
10. झाडांची सशक्त वाढ होऊन त्यांच्यात काही प्रमाणात किडींना व रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते.
11. गांडूळ खत विशेषतः अन्नधान्य, भाजीपाला व फळबागात उपयुक्त असते.