पपई खत व्यवस्थापन

जमीन
उत्तम निचऱ्याची, सुपीक, मध्यम काळी तांबडी पोयट्याची जमिन योग्य ठरते. जांभ्या खडकाच्या जमिनीत पपईची झाडे उत्तम वाढतात. जमिनीचा सामु ६.५ ते ८.० असावा. चुनखडीचा व खडकाळ जमिनीत पपईची झाडे चांगली वाढत नाहीत. पपई झाडाच्या मुळांची खोली ४० से.मी. पर्यंत खोल जात असल्यामुळे जमिनीचा वरचा थर भुसभुसीत नंतरचा ४५ से.मी. ठिसुळ मुरमाचा असल्यास पपई पिकाला अनुकुल असते.

हवामान
पपईचे झाड उष्ण कटिबंधात वाढणारे आहे. कडाक्याची थंडी व जोरदार वारे या पिकाला हानीकारक ठरतात. पपई पिकास सरासरी तापमान १५ ते ३० अंश से.ग्रे. आणि वार्षिक पाऊसमान १५०० मि. मि. मानवते. पपईच्या वाढीसाठी जास्तीत जास्त तापमान ४४ अंश से. ग्रे. व कमीत कमी १० अंश से. ग्रे पर्यंत सहन करू शकतात.

जाती
नर आणि मादी फुले वेगवेगळ्या झाडावर येणाऱ्या जाती वाशिंग्टन, को-५ को-६ पुसा ड्रॉफ, पुसा नन्हा, पुसा जांयट, त्याचप्रमाणे कुर्ग हनीड्यु, को-७ पुसा डेलिसियस, सनराईज सोलो, अर्का प्रभात ह्या उभयलिंगी आहेत. पेपेन साठी को - २, पुसा मॅजेस्टी या वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे.

रोपे तयार करणे
ताजे बी वापरुन रोपे तयार करावीत. एक हेक्टर साठी २५० ते ३०० ग्रॅम बियाणे पुरेसे आहे. पॉलिथीनपिशवित तयार केलेल्या रोपांची वाढ चांगली होते. त्यासाठी १५० गेज च्या १८ x ३३ से. मी. च्या गोल बुड असलेल्या प्लास्टिक पिशव्या रोपे वाढविण्याकरिता वापराव्यात. प्रत्येक पिशवीत १ ते ३ बी लावुन ते चांगल्या कुजलेल्या कंपोस्टने झाकुन पाणी द्यावे. रोपे लागवडीयोग्य सुमारे ६ ते ७ आठवड्यांनी तयार होतात.

प्रो ट्रेमध्ये रोपे तयार करणे
पपईची रोपे प्रो ट्रेमध्ये तयार करताना त्यातील व्यास ४२ मि.मी. असलेल्या प्रो ट्रे ची निवड करावी बियाणे प्रो ट्रे मध्ये लागवडीच्या एक दिवस आधी कोकोपिट पाण्यात भिजत ठेवावे. पोयटा माती आणि चांगले कुजलेले शेणखत चाळणीने चाळुन घ्यावे. ५ किलो कोकोपिट अधिक २.५ किलो पोयटा माती अधिक २.५ किलो कुजलेले शेणखत अधिक १०० ग्रॅम ट्रायकोट्रर्मा अधिक १०० ग्रॅम १०:१९ खत या प्रमाणात मिश्रण एकजीव करून ते प्रो ट्रे मध्ये भरून घ्यावे. मिश्रणाने भरलेल्या प्रो ट्रे मध्ये १.५ से.मी. खोलीवर पेरणी करून बियाणे अलगद झाकुन घ्यावे व झारीच्या सहाय्याने हळुवार पाणी द्यावे. बियाणे उगवेपर्यंत प्रो ट्रे पारदर्शक पॉलिथिनने झाकुन घ्यावेत किंवा प्रो ट्रेपॉलिहाऊस मध्ये ठेवावेत.

लागवड हंगाम
भारतात पपईची लागवड वर्षभरात मुख्यत्वे जुन-जुलै, सप्टेंबर-ऑक्टाबर, आणि जाने-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात. महाराष्ट्रात मुख्यत्वे लागवड जून ते ऑक्टोबर या महिन्यापर्यंत केली जाते.

परागीकरण
पपई फळपिकात नर व मादी झाडे स्वतंत्र असल्याने व अशी झाडे फुलोरा आल्याशिवाय ओळखता येत नसल्याने लागावडीच्या ठिकाणी दोन रोपे लावावी. मादी झाडापासुन उत्पादन मिळत असल्यामुळे या झाडांची संख्या जास्त असणे फायद्याचे असते. तसेच बागेमध्ये नर व मादी झाडे वेगवेगळी असल्यास १० टक्के नर झाडांची संख्या विखुरलेल्या स्वरुपात असावी. उभयलिंगी पपईच्या जातीची लागवड प्रत्येक लागवडीच्या ठिकाणी एकच रोप लावले जाते. उदा. कुर्ग हनीड्यु, अर्काप्रभात इ.

लागवड पद्धत
लागवडी पूर्वी जमिनीची आडवी उभी नागरणी करावी. कुळव्याच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडुन घ्यावीत व जमिन सपाट करावी.२.२५४२.२५ मी.किंवा २.५० ४२.०० मी. अंतरावर लागवड करावी.

खत व्यवस्थापन
पपई लागवड करावयाच्या क्षेत्रात शेणखत अथवा कंपोस्ट खत प्रति हेक्टरी ४०-५० बैलगाड्या (२० मे.टन) जमिनीत मिसळून द्यावे. लागवडीनंतर २००:२००:२०० ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रत्येक झाडास लागवडीनंतर समान चार हप्त्यात पहिल्या, तिसऱ्या, पाचव्या व सातव्या महिन्यात बांगडी पद्धतीने विभागुन द्यावीत.

पाणी व्यवस्थापन
हिवाळ्यात साधारणपणे दर १० दिवसानी तर उन्हाळ्यात आठवड्यातुन एकदा पाणी द्यावे. दुरेही आळे पद्धती, सरी किंवा ठिंबक सिंचन यांचा वापर केला जातो.

आंतरमशागत
बाग निंदून स्वच्छ ठेवावी. बागेची खादंणी दर दोन महिन्यांनी करावी. फुले आल्यावर १० टक्के नर झाडे ठेवुन बाकीची नर झाडे काढावीत. फळांची दाटी झाल्यास त्यांची विरळणी करावी. मुख्य खोडास येणारी वांझफुट लागलीच काढावी.

फळाची काढणी व विक्री
साधारणपणे पपईचे रोप लागवडीपासुन ३ ते ७ महिन्यांनी फुले येतात व त्यानंतर फळे काढणीसाठी चार महिन्यांनी तयार होतात. सालीतील चीक दुधासारखा न निघता पाण्यासारखा निघल्यास  सुरूवात झाल्यानंतर व पपईच्या फळावर पिवळा डोळा पडला म्हणजे पपई झाडावरुन काढण्यास तयार झाली असे समजावे. दुरच्या बाजारपेठेस फळे पाठवायची असल्यास फळे टोकाकडील बाजुस पिवळसर होताच काढावी. पपईच्या एका झाडापासुन सरासरी ३० ते ८० फळे ( ४० ते ८० किलो) मिळतात.

पपया रिंग स्पॉट किंवा पपया मोझॉक किंवा केवडा
हा विषाणुमुळे होणारा रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पपईच्या झाडावरील नवीन येणारी पालवी पिवळसर दिसते व वाढीच्या काळात पानांच्या शिरा हिरव्या दिसुन येतात. पाने हाताला चरचरीत लागतात व त्यावर पिवळसर हिरवे चट्टे दिसुन येतात. रोगाचा प्रादुर्भाव तीव्र असल्यास पानाचा आकार कमी होऊन पाने एखाद्या धाग्याप्रमाणे दिसतात. अशा रोगग्रस्त झाडांची फळे आकाराने लहान व वेडीवाकडी होतात. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होत. पपईवरील विषाणुजन्य रोग झाडावर आल्यानंतर त्याचे नियंत्रण होत नाही.
उपाय
१) रोगास प्रतीकारक्षम अथवा कमी बळी पडणाऱ्या जातीची लागवड करावी.
२) पपईवर विषाणुजन्य रोगास प्रसार मावा किडीमुळे होतो म्हणुन मावा किडीच्या नियंत्रणासाठी रोपे रोपवाटीकेत असल्यापासुन काळजी घ्यावी.
३) मावा किडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच १५ दिवसांच्या अंतराने १० मि. लि. डायमिथोएट किंवा १० मि.लि. निमार्क प्रति १० लिटर पाण्यातून फवारल्यास मावा किडीचे नियंत्रण होते.
४) पपईच्या बागेत मावा किडीचा शिरकाव टाळण्यासाठी बागेभोवती उंच पीक लावुन अडथळा निर्माण करावा. त्यामुळे बाहेरुन येणारा मावा किड पपईच्या बागेत येण्यास अडथळा निर्माण होतो व त्यामुळे विषाणुजन्य रोगाचा प्रसार कमी होतो.


खोडकुज किंवा बुंधासड
हा रोग बुरशीपासुन होतो. झाडाचा बुंधा काळा पडुन तो भाग मऊ होतो. पपईच्या बुंध्याला जास्त पाणी लागल्याने बुंधा सडतो.
उपाय
पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीतच पपईची लागवड करावी. खोडाला पाणी लागु नये म्हणुन दुहेरी बांगडी पद्धतीने पाणी द्यावे. बागेत जास्त वेळ पाणी साचु देऊ नये.

पिठ्या ढेकुण
या किडिचा प्रादुर्भाव पपईची पाने, खोड व फळांवर मोठ्या प्रमाणात दिसुन येतो. प्रादुर्भावग्रस्त भागावर काळी बुरशी वाढल्यामुळे कर्बग्रहनावर अनिष्ट परिणाम होतो व फळे खाण्यास अयोग होतात.
उपाय
प्रादुर्भाव ग्रस्त बागेत अॅसिनोफॅगस पपई परोपजीवी किटकाचे प्रसारण करावे.