म्हैस पालन
म्हैस पालन

म्हैस पालन

भारताच्या एकूण दूध उत्पादनात म्हैशीच्या दुधाचा वाटा ५५% इतका आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये अधिक असल्याने
सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे. म्हणून म्हशींचे संगोपन चांगल्या रितीने करण्याची गरज आहे. दूध उत्पादनाशिवाय मांसोत्पादन व ओढकामासाठी सुद्धा म्हशींचा / रेड्यांचा वापर केला जातो.

म्हशींच्या जाती
१. मुन्हा (दिल्ली) :
उत्तर भारतात तसेच महाराष्ट्रात ही जात आढळते. शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका
वेतातील दुधाचे प्रमाण २५०० ते ३००० लिटर असते. त्यात गाईच्या दुधापेक्षा स्निग्धाचे प्रमाण जास्त असते.

२. मेहसाणा :
ही जात सुरती व मुन्हा जातीच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुन्हा जातीशी मिळती
जुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी २२०० चे २४०० लिटरपर्यंत दूध देतात.

३. पंढरपुरी :
सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव परिसरात प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम पण
अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोहचणारी लांब व पिळवटलेली तलवारीसारखी शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य.
म्हशीचे वजन साधारण ४०० किलो व रेड्याचे वजन ५०० किलो असते. पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यात गाभण राहतात आणि ३५ ते ४०
महिन्यात पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताचे वेळी कमी वय,
उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातीत आढळत नाहीत.
या म्हशी एका वेतात १५०० ते १८०० लिटर दूध देतात. पंढरपुरी म्हशीच्या पैदाशीसाठी गोठीत विर्याच्या मात्रा रु. १४/- प्रति मात्रा या दराने राष्ट्रीय कृषि संशोधन
 प्रकल्प, शेंडापार्क , कोल्हापूर (०२३१-२६९३७१७) यांचेकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

४. सुरती :
शरीर बांधा मध्यम, डोळे मोठे, लांबट व रुंद असतात. भुवयाचे केस पांढरे व शिंगे मध्यम व विळ्यांच्या आकारांची
असतात. शरीराचा रंग भुरा काळपट असतो. एका वेतातील दुधाचे उत्पादन १८०० लिटर असते.

पैदास :
म्हशीचे प्रजोत्पादन करण्यासाठी शुद्ध जातीचा व उत्तम प्रतीचा रेडा निवडावा. लवकर गाभण राहणाऱ्या व जास्त दूध देणाऱ्या म्हैशीपासून पैदा
झालेला वळू निवडून त्याची चांगली जोपासना करावी. त्याचा उपयोग करून त्याच जातीची शुद्धता व वैशिष्ट्ये जतन करावीत.निवड पद्धतीनेच म्हशीमध्ये सुधारणा करणे शक्य आहे.
त्यापासून मिळणाऱ्या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते. जनावर व्याल्यावर २ महिन्याने वळू दाखवावा व विण्यापूर्वी दोन महिने जनावर भाकड करावे.

माजाची लक्षणे :
बहुतांशी म्हैशी सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर माजावर येतात. म्हशींचा सोट घट्ट असतो. गाईप्रमाणे तो लोंबत नाही किंवा पुठ्याला चिकटलेला नसतो. म्हैस वारंवार लघवी करते.
निरणाचे कातडीवर पांढरट क्षार दिसतात. माजावरील म्हशींचे निरण सुजल्यासारखे दिसते, निरणाचा रंग जास्त काळसर व तेलकट दिसतो.
म्हैस पान्हा चोरते, कास व सड ताठरलेले दिसतात. माजावरील म्हशींच्या पाठीवर थाप मारल्यास ती आपली शेपटी उंचावते.

आहार व निगा :
क्षमतेइतके दूध मिळण्यासाठी सर्वसाधारणतः ४००किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज २५ किलो हिरवा व ७ ते ८
किलो कोरडा चारा शरीर पोषणासाठी द्यावा. दूध निर्मितीसाठी, दररोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या ५०% खुराक द्यावा म्हणजे दूध
उत्पादनाचे सातत्य टिकून राहील. प्रत्येक म्हशीला पिण्यासाठी ६० ते ७५ लि. पाणी रोज लागते. म्हैशी डुंबण्यासाठी पाण्याची सोय असल्यास चांगले.